माँ अंबेनगर, भवानीनगर, एकतानगर, दुर्गानगर, राणी सतीनगर, समतानगर, भांडेवाडी व पारडी परिसरातील नागरिकांनी भरमसाट विकास शुल्क आकारणीच्या विरोधात संविधान चौकातून नागपूर सुधार प्रन्यास कार्यालयावर मोर्चा काढला.
नागपूर सुधार प्रन्यासकडून विकास नियोजन व विकास आराखडय़ाच्या नावाने वेळोवेळी विकास शुल्क नागरिकांकडून उकळले जाते. विकास शुल्क घेऊनही अनेक वस्त्यांत नागरी सोयी व पायाभूत गरजा पूर्ण केल्या जात नाहीत. अभिन्यासाच्या नियमितीकरणाच्या नावाने भूखंडधारक व रहिवासी नागरिकांकडून ५७२ ते २७०० अशा अभिन्यासाच्या वर्गवारीतून कोटय़वधी रुपयांचा विकास शुल्क निधी प्रन्यासने गोळा केला आहे. हा विकास शुल्क गरीब नागरिकांना झेपणारा नाही. नासुप्रकडून त्यांना विकास शुल्क भरण्याची ताकीद नोटीसद्वारे दिली जात आहे. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. गरीब नागरिक महागाईमुळे डबघाईस आले आहेत. त्यांच्यात हे विकास शुल्क भरण्याची ऐपत नाही. त्यामुळे १०४ रुपये प्रति चौ. फूट हे वाढीव विकास शुल्क दर अविलंब रद्द करून जुन्या दराच्या दुपटीने लागू करण्यात यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.