आगामी महापालिका निवडणुकीत आघाडी करण्याबाबत पक्षश्रेष्ठींनी निर्णय घ्यावा, परंतु शहर जिल्हा काँग्रेस स्वबळाच्या भूमिकेवर ठाम आहे, असे स्पष्ट प्रतिपादन पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष ब्रिजलाल सारडा यांनी केले.
शहर जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत ते बोलत होते. पक्षाच्या शहर शाखेत गेले दोन दिवस निर्माण झालेल्या पक्षांतर्गत वादळाच्या पाश्र्वभुमीवर आजची बैठक शांततेत झाली. उत्तराखंडातील पुरग्रस्तांसाठी मदत म्हणुन सारडा यांनी ५ हजार रुपये, नगरसेवक धनंजय जाधव यांनी ११ हजार रुपये व नगरसेवक निखिल वारे यांनी एक महिन्याचे मानधन जाहीर केले. अन्न सुरक्षा विधेयकाला मंजुरी दिल्याबद्दल पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, पंतप्रधान मनमोहनसिंग यांचे तसेच शिर्डीतील विभागीय बैठकीच्या नियोजनाबद्दल जयंत ससाणे यांचे अभिनंदन करण्यात आले.
पक्षाने मनपा निवडणुकीची पुर्वतयारी सुरु केली आहे, इच्छुकांनी आपल्या भागात कार्यरत रहावे, पक्ष निष्ठेने प्रभागात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न आपण करु, असेही सारडा यांनी सांगितले.
मनपा निवडणुकीसंदर्भात धनंजय जाधव, निखिल वारे, दिप चव्हाण, डॉ. अविनाश मोरे, निलिनी गायकवाड, सविता मोरे, डॉ. सादिक मोहमद, अनुराधा येवले, छाया रोकडे, हनिफ शेख, डी. जी. भांबळ, सुभाष गुंदेचा, उबेद शेख, बाळासाहेब भंडारी तसेच भिंगार छावणी मंडळाच्या निवडणुकीसाठी आर. आर. पिल्ले, कलिम शेख, शाम वाघस्कर, रिजवान शेख आदींनी सूचना केल्या. शहर जिल्हा सरचिटणीस अनंत देसाई यांनी सूत्रसंचलन केले. शहर ब्लॉकचे अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी प्रास्ताविक केले. खलील सय्यद यांनी आभार मानले.