सायबर सिटी, इको सिटी, प्लॅन सिटी अशा बिरुदावलीत वावरणाऱ्या नवी मुंबईची आता ‘सिटी ऑफ बांगलादेशी’ अशी एक नवीन ओळख तयार होत असून रियल इस्टेटच्या पदोपदी संधी असलेल्या या शहरात मजूर म्हणून बांगलादेशी घुसखोर नागरिकांची संख्या दिवसेंदिवस मोठय़ा प्रमाणात वाढत असल्याची बाब चिंताजनक आहे. नवी मुंबई, पनवेल, उरण या भागात सुमारे २५ हजार बांगलादेशी नागरिक कार्यरत असण्याची शक्यता पोलीस सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे. बांगलादेशी नागरिकांवर कारवाई करून त्यांना मायदेशी सोडण्याची अंत्यत गुंतागुंतीची व खर्चीक प्रक्रिया असल्याने पोलीस ही कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याची बाबदेखील यामुळे निदर्शनास आली आहे.
पश्चिम बंगालमार्गे देशाच्या कानाकोपऱ्यात घुसखोरी केलेल्या बांगलादेशी नागरिकांवर कारवाई करण्याचे कोणतेही धोरण केंद्र सरकारचे नसल्याची बाब दिल्ली उच्च न्यायालयाने एका प्रकरणात अधोरिखित केली. देशात तीन कोटी बांगलादेशी नागरिक राहात असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. बांगलादेशी घुसखोरांचे देशातील सर्वात आवडते शहर म्हणून मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे या शहरांकडे पाहिले जात आहे. मुंबईत पैसा उडतो, पकडणारा हवा अशी एक म्हण आहे. संवादाची कोणतीही समस्या न येणाऱ्या मुंबईत आणि त्याचबरोबरोबर येथे कोणीही उपाशी राहात नसल्याची बाब या बांगलादेशी घुसखोरांना चांगलीच माहीत आहे.
त्यात नवी मुंबईत बांधकाम व्यवसायाला मोठी झळाली प्राप्त झाल्याने या बांगलादेशी घुसखोरांचा कल या शहराकडे जास्त आहे. या घुसखोरीवर विधानसभेतदेखील चर्चा झाली पण त्यानंतर केलेल्या थातुरमातुर कारवाईनंतर ही संख्या रोडावण्यापेक्षा फोफावण्यास सुरुवात झाली आहे. खारघर येथे बांगलादेशी वसाहतीवर एक वर्षांपूर्वी कारवाई करण्यास गेलेल्या मुंबई समाजसेवा शाखेच्या पोलिसांवर तुफान दगडफेक करण्यात आली होती. त्यात एक पोलीस अधिकारी जखमी झाला होता. तेव्हापासून पोलीस बांगलादेशी वसाहतीवंर कारवाई करण्यास कचरत आहेत. बांधकामासाठी लागणारे स्वस्त मजूर, तळोजा, उरण व नवी मुंबईतील औद्योगिक कारखान्यात काम करणारे कामगार, पती-पत्नी नोकरी करणाऱ्या घरातील साफसफाई करणाऱ्या मोलकरीण, लेडीज बारमधील महिला वेटर, सिग्नलवर भीक मागणाऱ्या महिला आणि त्यांची मुले ह्य़ा सर्व क्षेत्रांत बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी वाढलेली आहे. ती दिवसेंदिवस वाढत असून या नागरिकांकडे भारतीय मतदान व आधार कार्ड असल्याची बाब एका उच्च अधिकाऱ्याने सांगितली. त्यामुळे हे नागरिक बांगलादेशी आहेत असे माहीत असूनही कारवाई करता येत नसल्याची अडचण त्यांनी व्यक्त केली. त्यात या बांगलादेशी नागरिकांवर कारवाई केल्यास त्यांना अटक करणे, न्यायालयात हजर करणे, त्याची शिक्षा पूर्ण होण्याची वाट पाहणे आणि त्यानंतर त्यांची मायदेशी रवानगी करण्यासाठी पदरमोड करणे ही सर्व प्रक्रिया गुंतागुंतीची आणि मानसिक त्रास देणारी असल्याने शक्यतो पोलीस या भानगडीत पडत नसल्याचे एका पोलिसाने सांगितले. त्यांच्यावर करण्यात आलेला खर्च नंतर शासनाकडून मिळेल का, याचीही काही खात्री नाही.
विशेष म्हणजे इतका द्राविडी प्राणायम करून दहा-पंधरा बांगलादेशी नागरिकांना त्यांच्या मायदेशात पाठविण्यात पोलीस यशस्वी झाले तरी पोलीस घरी येईपर्यंत हे बांगलादेशीदेखील पुन्हा त्याच जागी येत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे १०० कोटींच्या या देशात आणखी एक दोन कोटी बांगलादेशींनी पोट भरल्यास बिघडले कुठे, अशी एक मानसिकता पोलिसांची तयार झाली आहे. नवी मुंबईतील घुसखोर बांगलादेशी नागरिकांवर वारंवार कारवाई केली जात आहे. त्याची माहिती एकत्रित करून देण्यास दोन-तीन दिवस लागतील असे उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी स्पष्ट केले.