या वर्षी एखादा अपवाद वगळता मुसळधार असा पाऊस झाला नसला तरी उन्हाळ्यात चकचकीत दिसणाऱ्या शहरातील रस्ते रिमझिम पावसाचाही मारा सहन करण्यालायक नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ठिकठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडले असून महापालिकेने रस्त्यांची डागडुजी सुरू केली असली तरी पावसामुळे ही डागडुजी तग धरत नसल्याने रस्त्यांची अक्षरश: वाट लागली आहे. त्यातच प्रमुख रस्त्यांवर चिखलमय माती आल्याने दुचाकी घसरून अपघात होऊ लागले आहेत.
राज्यात सर्वाधिक उद्याने असणारे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमधील चकाचक रस्त्यांचे बाहेरगावाहून येणाऱ्या पर्यटकांना अप्रुप वाटत असते. अर्थात, तसे वाटण्याचे कारण या रस्त्यांचे दर्शन ते पावसाळ्याच्या हंगामात घेत नसावेत. उन्हाळा व हिवाळ्यात चकचकीत दिसणाऱ्या रस्त्यांचे रूप पावसाळ्यात पूर्णत: पालटते. नेहमीप्रमाणे यंदाही शहरातील पंचवटी, गंगापूररोड, अंबड, सातपूर, सिडको, नाशिकरोड आदी सर्वच भागात त्याची प्रचिती येत आहे. शहरवासीयांना हा अनुभव नवीन नसला तरी दरवर्षी उद्भवणाऱ्या समस्येवर महापालिका कायमस्वरूपी तोडगा काढू शकलेली नाही. या वर्षी सुरूवातीच्या एका पावसाचा अपवाद वगळता दमदार पाऊस झालेला नाही. दीड महिन्यांपासून अधुनमधून पावसाची रिपरिप होत आहे.
या पावसाने शहरातील बहुतेक रस्त्यांची चाळणी केली असून ठिकठिकाणी पडलेल्या खड्डय़ांमुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे. खड्डय़ांमध्ये पाणी साचल्यामुळे कोणता खड्डा किती खोल याचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघातही होत आहेत. काही रस्त्यांवर तर असे खड्डे पडले आहेत की, मार्गस्थ होणाऱ्या दुचाकीस्वारांना सतत गतीरोधकावरून जात असल्याची अनुभूती मिळत आहे.
शहरातील प्रमुख रस्तेही त्यास अपवाद ठरलेले नाहीत. खड्डय़ांमुळे धोकादायक झालेल्या रस्त्यांविषयी ओरड होऊ लागल्यावर महापालिकेला डागडुजीचे काम हाती घेण्याची उपरती झाली. वरून पाऊस सुरू असताना करण्यात येणारी डागडुजी फारशी उपयोगी ठरू शकलेली नाही. आधीच्या पावसाने पडलेले खड्डे बुजविण्याचे काम जिथे जिथे झाले, ते सर्व पाण्यात वाहून गेले. यामुळे त्या रस्त्यांची अवस्था पुन्हा जैसे थे झाली. ज्या रस्त्यांना डागडुजीचे भाग्य लाभले नाही, त्यांची अवस्था अधिक बिकट झाली आहे. काही कॉलनी रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी हाती घेण्यात आली होती. वास्तविक पावसाळ्यात रस्त्यांची कामे केली जात नाहीत. तरीदेखील पालिकेने काही ठिकाणी ते करण्याची करामत केली. तर काही कामे खडीकरणाच्या टप्प्यानंतर पूर्णत्वास जाऊ शकली नाही. या अर्धवट रस्त्यांवर चिखलाचा असा काही थर साचला की येथे कधी खडीकरण झाले होते की नाही, असा प्रश्न पडावा.
माती वाहून नेणाऱ्या मालमोटारींमुळे गंगापूररोड, दहिपूल ते महात्मा गांधी रोड असे काही रस्ते चिखलाच्या गर्तेत सापडले आहेत. म्हणजे एखाद्या रस्त्यावर खड्डय़ांचे अडथळे पार करत येणाऱ्या वाहनधारकांना पुढे काही रस्त्यांवर असा चिखलमय रस्त्यावर धोकादायक प्रवास करावा लागतो. पालिकेच्या लेखी डागडुजीचे कागदी घोडे नाचविले जात असले तरी खड्डय़ांमुळे अपघातास जबाबदार कोण, असा सवाल वाहनधारकांकडून उपस्थित केला जात आहे.