वाशीम जिल्हा परिषदेचा बांधकाम उपविभाग हा मालेगाव येथे होऊन त्याचा रीतसर उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला. नैसर्गिक न्यायाचा विचार करता हा उपविभाग रिसोड येथे व्हावयास हवा होता; परंतु तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्यांनी यास विरोध न दर्शविता उद्घाटन सोहळ्यास हजेरी लावून आपल्या अकार्यक्षमतेची एक प्रकारे पावती दिली असल्याची संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
यात भुतेकर यांनी म्हटले आहे की, मालेगाव ते वाशीम हे अंतर १८ कि.मी. आहे व रिसोड ते वाशीम हे अंतर ४० कि.मी. आहे. रिसोड तालुक्यातील नागरिकाला जिल्हा परिषदेच्या बांधकाम उपविभागात जाण्यासाठी मालेगाव येथे ४२ कि.मी. जावे लागणार नाही आणि नंतर तेथून वाशीम विभागात म्हणजे जवळपास परत येण्यासाठी १०० ते ११० कि.मी.चा फेरा पडणार आहे.
नैसर्गिक नियमाचा विचार करता हा उपविभाग रिसोड येथेच होणे गरजेचे होते. तालुक्यातील सत्ताधारी चार व विरोधी पक्षाचे पाच, असे नऊ जिल्हा परिषद सदस्य रिसोड तालुक्यातील आहेत. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष अथवा सभापती ठरवायचा झाला तर तो रिसोड येथून ठरतो, तसेच जिल्ह्य़ातील कोणतीही राजकीय निर्णायक घटना येथूनच घडते, मात्र कायमस्वरूपी कार्यालयाचा अथवा विकास संदर्भात एखादी चांगली बाब असली तर रिसोड तालुक्याला डावलले जाते.
हा उपविभाग मालेगाव येथे गेला व त्याच्या उद्घाटन सोहळ्याला तालुक्यातील काही हजरजबाबी जिल्हा परिषद सदस्यांनी कुठलाही विरोध न दर्शविता हजेरी लावली. याचा अर्थ, तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्यांनी गेल्या चार वर्षांतील ही महत्त्वपूर्ण कामगिरीच म्हणावी लागेल. वाशीम जिल्हा परिषदेवर माजी खासदार अनंतराव देशमुख गटाचे वर्चस्व आहे, तसेच विद्यमान आमदार सुभाषराव झनक याच तालुक्यातील असून हे काँग्रेसचे दिग्गज नेते आहेत; परंतु या दोन्ही नेत्यांच्या काटशह व सोयीच्या राजकारणामुळे तालुक्यातील विकास खुंटत आहे. याचा फायदाच मालेगाव तालुक्यातील नेत्यांनी घेऊन जिल्हा परिषदेचा बांधकाम उपविभाग मालेगाव येथे पळवला, असे शेवटी भुतेकर यांनी सांगितले.