गेली १२ वर्षे कर्करोगावर संशोधन करून तयार केलेल्या औषधांनी कर्करोगबाधित रुग्णांना आजारातून मुक्त केल्याचा दावा डॉ. प्रिया उपाध्ये यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. आपण बनविलेल्या औषधांचे पेटंट मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले असून, काही नामवंत औषध कंपन्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला असल्याचे त्यांनी सांगितले.
कर्करोग व त्यावरील उपचार पद्दती याविषयी डॉ.उपाध्ये म्हणाल्या, मानवी शरीरात कुठेही अनैसर्गिक व मोठय़ा प्रमाणात पेशींची वाढ होणे म्हणजे कर्करोग होय. जगभरात सध्या कर्करोगावर रेडिओथेरपी, केमोथेरपी व शस्त्रक्रिया अशा पद्धतीने उपचार सुरू आहेत. यामुळे रुग्णांचे शारीरिक व मानसिक हाल होण्याबरोबर आर्थिक नुकसान होत असते. या उपचार पद्धतीमुळे कर्करोग थोपवता येतो तो बरा होत नाही. मात्र आपण तयार केलेल्या औषधांमुळे कर्करोगाचे रुग्ण पूर्णपणे बरे होतात, हे सिद्ध झालेले आहे. संशोधित केलेले औषध रुग्णांना तोंडावाटे दिले जाते. कोणत्याही वयोगटातील कर्करुग्णास हे औषध घेण्यास योग्य आहे. औषधाचे संशोधन त्यांनी स्वखर्चाने पूर्ण केले आहे.     
आजरा या तालुक्याच्या ठिकाणी राहणारे लक्ष्मण बळवंत निकम ही ६० वर्षांची व्यक्ती उजव्या किडनीच्या रोगाने त्रस्त होती. केमोथेरपी उपचारासाठी ते मुंबईला जात होते. मात्र त्यांची प्रकृती गंभीर होत चालली होती. गतवर्षी जानेवारी महिन्यात ते डॉ. उपाध्ये यांच्या येथील ‘ग्रेस हार्ट अ‍ॅन्ड हेल्थ फौंडेशन’ रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. वर्षांनंतर ते पूर्णत: बरे झाले असून सामान्य माणसासारखे आयुष्य जगत आहेत. त्यांच्या मेंदूचा एमआरआय काढण्यात आला असून मेंदूतील दोन्ही कर्करोगाच्या गाठी विरून गेल्या आहेत, असे डॉ. उपाध्ये व निकम यांनी पत्रकारांना सांगितले. या उपचाराबाबत विकीपीडियामध्ये तज्ज्ञांची चर्चा सुरू असते. कर्करोगावरील प्रगत उपचारपद्धती शोधण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.