आंतरराज्य पाणी लवादाने पाणीवाटपात मराठवाडय़ावर घोर अन्याय केला आहे. मराठवाडय़ाच्या पाणी हक्कासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आगामी काळात संघर्ष करेल, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस अनिल शिदोरे यांनी सांगितले.
मनसे आयोजित पाच दिवसीय कृषिप्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रदेशाध्यक्ष आदित्य शिरोडकर, प्रदेश उपाध्यक्ष राजेश येरुलकर, लातूर जिल्हा संपर्क अध्यक्ष साईनाथ दुग्रे, जिल्हाध्यक्ष अभय साळुंके, संतोष नागरगोजे, सुनील मलवाड, गणेश गवारे, फुलचंद कावळे आदी उपस्थित होते.
शिदोरे म्हणाले, शेतीचा प्रश्न ‘बापा’शी निगडित आहे. ‘बा’ म्हणजे बाजार व ‘पा’ म्हणजे पाणी अशी फोड करून ते म्हणाले, शेतमालाला योग्य बाजारपेठ मिळणे व उत्पादनवाढीसाठी पुरेसे पाणी मिळणे या बाबी आवश्यक आहेत. शेतकरी हा अतिशय सजग, कष्टाळू आहे. नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून उत्पादनवाढीसाठी तो प्रयत्न करतो आहे. राजकारण्यांनी त्याला आपल्यापरीने मदत करण्याची गरज आहे. आंतरराज्य पाणी लवादाने पाणीवाटपात गेल्या ३० वर्षांपासून मराठवाडय़ावर घोर अन्याय केला आहे. मराठवाडय़ाच्या हक्काचे पाणी अन्यत्र वळवण्यात आले आहे. मात्र, त्यासंबंधी कोणीही आतापर्यंत भाष्य केले नाही. मनसे आगामी काळात या प्रश्नावर तीव्र संघर्ष करणार असल्याचा इशारा त्यांनी या प्रसंगी दिला. लातूरने आतापर्यंत अनेक पॅटर्न निर्माण केले आहेत. कृषिप्रदर्शनाच्या निमित्ताने मनसेने कृषिप्रदर्शनाचा नवा पॅटर्न लातूरला दिला असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युसुफ शेख यांनी केले.