संगीताचा वापर आजपर्यंत केवळ मनोरंजनासाठी झाल्याने आत्म्याचा आनंद हा त्याचा पैलू काहीसा दुर्लक्षित राहिला. भारतीय शास्त्रीय संगीतात आत्म्याला सुख देण्याची ताकद आहे. मनोसंगीत हा नाद योगाचा प्रकार असून त्यामुळे जीवनात सकारात्मक बदल घडतात, असे प्रतिपादन संगीतकार संजय गिते यांनी केले.
येथील यशवंतराव महाराज पटांगणात आयोजित नाशिक वसंत व्याख्यानमालेत आठवे पुष्प गुंफतांना गिते यांनी ‘मनोसंगीत एक सकारात्मक जीवन संगीत शैली’ या विषयावर उपस्थितांशी संवाद साधला. अनेक वेळा आपण स्वत:हून आपल्या जीवनशैलीने आजार, व्याधी ओढवून घेत असतो. धावपळीच्या जीवनात याचा परिणाम जसा शरीरावर होतो, त्याच्या कितीतरी पट मनावर होतो. अशा परिस्थितीत संगीताचा उपयोग जीवन बदलण्यासाठी केला गेला पाहिजे. शास्त्रीय संगीतामुळे मन, बुद्धी, विचार आणि कृती यामध्ये बदल घडून येतो. संगीत हे आत्मा व मन जागविण्याचे कार्य करते. शास्त्रीय संगीत समजून घेण्याची गरज आहे, असे गिते यांनी नमूद केले.
पाश्चात्त्य संगीतामुळे केवळ शरीराला आनंद मिळतो. आत्मा हा आनंदापासून वंचित राहतो. सध्याची पिढी ही पाश्चात्त्य संगीतामध्ये वाहत जात असून बेभान होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. पाश्चिमात्य देशात मात्र स्पंदनात्मक, कंपनात्मक औषधोपचार पद्धती विकसित होऊ लागली आहे.
माणसाने भारतीय संगीताकडे वळले पाहिजे. सुमधुर संगीताद्वारे आत्मा जागा करण्याचे काम सहज होते, असे निरीक्षण त्यांनी नोंदविले. या वेळी सहकाऱ्यांच्या मदतीने मनोसंगीतावर आधारित विविध गीते त्यांनी सादर केली. त्यांना अनिल गिते, अविनाश गांगुर्डे, कन्हय्या खैरनार यांनी साथ दिली.