स्वत:च्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी सुमारे शंभर मुलींनी एकत्र येऊन दिवाळीसाठी आकर्षक पणत्या तयार केल्या आहेत. केअर फॉर यू फाऊंडेशनच्या पुढाकारातून राबवण्यात आलेल्या या उपक्रमात दोन दिवसांत तब्बल ४ हजार पणत्या बनवण्यात आल्या आहेत.
बालिकाश्रम, क्लेरा ब्रुस विद्यालय, स्नेहालय, बालभवन आदी संस्थांमधील शंभर मुली या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या. केअर फॉर यू फाऊंडेशनने दिवाळीच्या निमित्ताने या पणत्यांच्या विक्रीची व्यवस्था उभी केली असून, ३० रुपयांना चार या दराने पणत्यांची विक्री करण्यात येणार असून, त्यातून मिळणारे पैसे या उपक्रमातील सहभागी मुलींना त्यांच्या शैक्षणिक गरजांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेच्या प्रमुख पायल सारडा-राठी यांनी दिली.
सारडा यांनी सांगितले, की व्यावसायिक आर्किटेक्ट अयोध्या लोहे यांनी या मुलींना आकर्षक पणत्या बनवण्याचे प्रशिक्षण दिले. दाळ मंडईतील माहेश्वरी भवनात हे प्रशिक्षण देण्यात आले व तेथेच या पणत्या बनवण्यात आल्या. आकर्षक रंगीबेरंगी पणत्या हे त्याचे वैशिष्टय़ असून त्यावर स्पर्कल सजावट करण्यात आली आहे. विक्रीसाठी चार पणत्यांचे एक याप्रमाणे पाकिटे तयार करण्यात आली आहेत. टिकम रोहिडा, उमेश डोडेजा, स्मिता बैसास, गीता माळवदे, विनीता सारडा, समता दमाणी, मधुसूदन सारडा आदींचे या उपक्रमाला सक्रिय सहकार्य लाभले.
संस्था गेल्या चार वर्षांपासून शहरात वृद्ध व गरजू मुला-मुलींसाठी कार्यरत आहे. फिरोदिया व मातोश्री वृद्धाश्रमातील वृद्धांसाठी संस्थेने विविध उपक्रम राबवले. अनाथ मुलांमध्ये शिक्षणाची जागृती करून उच्चशिक्षणाच्या दृष्टीने त्यांना मार्गदर्शन केले जाते. इयत्ता नववी व दहावीच्या मुलींसाठी आता नव्याने केअर क्लब सुरू करण्यात आला असून, त्यामार्फत या मुलींसाठी दर रविवारी विविध उपक्रम राबवण्यात येत असल्याची माहिती पायल सारडा-राठी यांनी दिली.