जिल्ह्यातील अत्यंत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या श्रीगडावर येथील शिवकार्य गडकोट मोहिमेच्या कार्यकर्त्यांनी ११ वा श्रमदानाचा टप्पा पार पाडला.
श्रीगड आजही भक्कमपणे उभा असून उंचच उंच कातळ कडा आणि खोल दरी, भुयारी पायऱ्या ही श्रीगडाची वैशिष्टय़े आहेत.
नाशिकच्या तरुणांनी जिल्ह्य़ातील ऐतिहासिक गडकिल्ल्यांचा इतिहास सर्वापुढे यावा आणि त्यांचे संवर्धन व्हावे म्हणून शिवकार्य गडकोट मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेच्या ११ व्या टप्प्यात त्र्यंबकेश्वरजवळील ब्रह्मगिरीलगत असलेला श्रीगडवर स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. या गडालाच त्र्यंबक गड, श्रीशैल्य अशीही नावे आहेत. दरीतील निमुळत्या वाटेने गडावर जावे लागते. समुद्र सपाटीपासून ४२४८ फुट उंचीवर तसेच पायथ्यापासून १८०० फूट उंच अशा या  गडाचा विस्तार १० मैलाचा तर माथा चार मैलाचा आहे. कातळ कडे २०० ते ४०० फुट उंचीचे आहेत. किल्याला दोन दरवाजे असून सुमारे २२ बुरूज, रसद व शश्त्र साठविण्यासाठी गुहा आहे. १८१८ मध्ये गडावरील अनेक वाडे आणि गुहा उद्ध्वस्त करण्यात आल्या.
कातळ खोदीव ३०० पायऱ्या चढून श्रीगडावर जावे लागते. १२७१ ते १३०८ दरम्यान श्रीगड देवगिरीचे राजे रामचंद्र यांच्या ताब्यात होता. त्यानंतर निजामशाहीच्या ताब्यात गेला. निजामशाहीनंतर मोगलांनी तो मिळविला. कांचन बारीच्या युद्धानंतर शिवकाळात सरदार मोरोपंत पिंगळे यांनी तो काबीज केला. १६८२ मध्ये रामशेजच्या युद्धात मोरोपंत पिंगळेनी श्रीगडावरून सैन्य आणि रसद पाठवल्याचा इतिहासात उल्लेख आहे. १७०८ मध्ये शाहू राजांनी गड ताब्यात घेतला. मराठे आणि इंग्रज यांच्यात श्रीगडावर युध्द झाले. गड ताब्यात घेण्यासाठी इंग्रजांनी केलेल्या तोफांच्या भडीमाराने गडाचे नुकसान झाले.
श्रीगडावरील तळे आता बुजले असून भुयाही मार्ग श्रमदानातून खोदावी लागतील. ते काम पुढील टप्प्यात करण्याचा निर्णय शिवकार्य गडकोट मोहिमेच्या कार्यकर्त्यांनी घेतला. यापुढे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, त्यासाठी स्थानिक दुर्ग संवर्धकांची समिती नेमावी अशी मागणी करण्यात येणार असल्याचे शिवकार्य गडकोट मोहिमेचे संस्थापक राम खुर्दळ यांनी सांगितले,
श्रीगडावर जुन्या कोरलेल्या देवांच्या मूर्ती कार्यकर्त्यांनी श्रमदानातून मातीतून मोकळ्या केल्या. कचरा जमा केला. स्वच्छता केली. यावेळी ज्येष्ठ गडप्रेमी महेंद्र कुलकर्णी यांनी ‘शूर आम्ही सरदार’ हे वीरगीत सादर केले. तर खुर्दळ यांनी बाजीप्रभू देशपांडे यांच्या बलिदानावरील गीत सादर केले. मयुरेश जोशी यांनी श्रीगडाची माहिती दिली. या प्रसंगी मुख्य संयोजक आनंद बोरा, पक्षिमित्र भीमराज राजोळे आदी उपस्थित होते.