कचरा उचलण्यासाठी जेसीबी यंत्रांचा वापर
– घाणीचे ढीग उचलले
– नागरिकांमध्ये समाधान.. चिंता मात्र कायम
– नालेसफाईचे मात्र तीनतेरा

ठेकेदाराच्या असहकारामुळे घंटागाडीचा प्रयोग पुरता फसल्याने नवी मुंबईतील सर्वच उपनगरांमध्ये गेल्या महिनाभरापासून कचऱ्याचे ढीग साचले होते. मुसळधार पावसात जागोजागी कचरा साचल्यामुळे स्वच्छ नवी मुंबईचा दावाही फोल ठरूलागला होता. एकीकडे अस्वच्छतेचे हे चित्र सर्वसामान्य नवी मुंबईकरांना अस्वस्थ करू लागले असताना सोमवारी सकाळी मात्र कोण चमत्कार घडला. घाणीने वाहू लागलेल्या कचऱ्याकुंडय़ा रिकाम्या करण्यासाठी शहरभर वाहने फिरू लागली. रस्त्यावर चोहोबाजूंनी पसरलेला कचऱ्याचा ढीग उपसण्यासाठी चक्क जेसीबी यंत्रांना पाचारण करण्यात आले. मुसळधार पाऊस सुरू झाल्यानंतर नालेसफाई पाहणीचे वरातीमागून घोडे दामटणाऱ्या महापौर सागर नाईक यांच्या आगमनापूर्वी नवी मुंबईचा कानाकोपरा सोमवारी स्वच्छ झाला खरा, मात्र या दौऱ्यानंतरही हे चित्र कायम राहील का, असा सवाल आता नवी मुंबईकर उपस्थित करू लागले आहेत.
नवी मुंबईचे सिंगापूर बनविण्यासाठी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते हजारो कोटींचे इमले एकीकडे रचत असताना गेल्या महिनाभरापासून शहरात पसरलेल्या घाणीच्या साम्राज्याकडे मात्र कुणी ढुंकूनही पाहत नसल्याचे विदारक चित्र दिसू लागले आहे. नवी मुंबईत कचरा सफाई आणि वाहतुकीची वेगवेगळी कंत्राटे दिली जातात. कचरा वाहतुकीच्या कामासाठी ऐरोली आणि बेलापूर अशा दोन विभागांत सुमारे २३० कोटी रुपयांचे काम महापालिकेमार्फत प्रस्तावित असून या कंत्राटाच्या मूळ रकमेत कोटय़वधी रुपयांचा घोटाळा असल्याचा आरोप शहरातील काँग्रेस आणि शिवसेना अशा दोन राजकीय पक्षांनी केला आहे. त्यामुळे दोन विभागांत निघणारे हे काम निविदाप्रक्रियेपूर्वीच वादात सापडले आहे. शहरातील कचरा वाहतूक नव्या कंत्राटदारामार्फत होणार असल्यामुळे विद्यमान ठेकेदार अ‍ॅन्थोनी कंपनीमार्फत सफाईच्या कामात दिरंगाई सुरू असल्याची ओरड खुद्द सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक करू लागले आहेत. शहरातील कचराकुंडय़ांमधून जमा होणारा कचरा क्षेपणभूमीपर्यंत (डंपिंग ग्राउंड) नेणारी यंत्रणा कुचकामी ठरल्यामुळे शहरभर घाणीचे साम्राज्य पसरल्याचे चित्र दिसू लागले आहे.
महापौरांचा दौरा फळला
पावसाळा सुरू होऊनही कचराकुंडय़ांमधील कचरा उचलला जात नसल्यामुळे नागरिकांमधून नाराजीचे तीव्र सूर उमटू लागले आहेत. या पाश्र्वभूमीवर शहरातील नाल्यांची सफाई कुठवर आली हे पाहण्यासाठी सोमवारी नवी मुंबईच्या दौऱ्यावर निघालेले महापौर सागर नाईक यांचा हा पाहणी दौरा नवी मुंबईकरांच्या पथ्यावर पडला. नाल्यांच्या पाहणीसाठी महापौर गल्लोगल्ली फिरणार. त्यामुळे कचऱ्याने वाहणाऱ्या कुंडय़ाही ते पाहणार. हे लक्षात येताच कामाला लागलेल्या प्रशासनाने सोमवारी सकाळपासून ऐरोलीपासून बेलापूपर्यंत सर्व उपनगरांमध्ये साचलेला कचरा उचलण्याची मोहीम हाती घेतली. वाशी, कोपरखैरणे, नेरुळ भागांत तर कचराकुंडय़ाबाहेर कचऱ्याचे अक्षरश: ढीग साचले होते. हे ढीग उपसण्यासाठी जेसीबी यंत्रे मागविण्यात आली. कंत्राटदाराच्या घंटागाडय़ा उपलब्ध नसल्यामुळे कचरा उचलण्यासाठी वाहने भाडय़ाने मागविण्यात आली. जेसीबीने उचलण्यात आलेला कचरा या वाहनांमधून क्षेपणभूमीपर्यंत पोहोचविण्यात आला. शहरात साचलेला कचरा उचलला गेल्यामुळे नवी मुंबईकर समाधान व्यक्त करत असले तरी महापौरांच्या दौऱ्यानंतरचे चित्र कसे असेल, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.