अतिरिक्त कर्मचारी उपलब्ध होणार
 झपाटय़ाने होणाऱ्या नागरीकरणामुळे शहरातील पायाभूत सुविधांवर पडणारा ताण लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने साफसफाई सेवेच्या खासगीकरणाच्या दृष्टीने पहिले पाऊल उचलले असून मुंब्रा, कौसा, रशीद कपाऊंड, रेती बंदर अशा पट्टय़ात सफाईची कामे यापुढे खासगीकरणाद्वारे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या मानाने महापालिकेच्या सफाई विभागातील कर्मचाऱ्यांची संख्या पुरेशी नाही. नव्याने भरती करण्यात अडचणी उभ्या राहिल्याने सफाईसाठी कर्मचारी उपलब्ध करताना घनकचरा विभागास अक्षरश: घाम फुटू लागला आहे. नवी मुंबई तसेच आसपासच्या महापालिकांनी साफसफाई सेवेच्या खासगीकरणाचा मार्ग केव्हाच स्वीकारला असताना ठाण्यात मात्र हा भार महापालिकेला असहय़ होऊ लागला आहे. त्यामुळे मुंब्रा प्रभाग समितींतर्गत येणाऱ्या परिसराची सफाई खासगीकरणाद्वारे करून हा भार हलका करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
ठाणे महापालिकेची लोकसंख्या सुमारे १८ लाखांच्या घरात आहे. साधारणपणे ५०० लोकसंख्येमागे एक सफाई कर्मचारी असणे आवश्यक असते. या नियमानुसार ठाणे परिसराची स्वच्छता करण्यास महापालिकेस ३६०० कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. ठाणे महापालिका हद्दीत महापालिका आस्थापनेवर २३३५, ठेकेदाराकडील ६८५ आणि घंटागाडीवरील ३५७, असे एकूण ३३७७ कर्मचारी दैनंदिन साफसफाईचे काम करतात. म्हणजेच, दैनंदिन साफसफाईकरिता ३२३ कर्मचारी अपुरे आहेत. त्यामुळेच महापालिका प्रशासनाने मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रातील दाट लोकवस्ती असलेल्या भागाची दैनंदिन साफसफाई खासगी पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंब्रा विभागाची साफसफाई करण्यासाठी तीन गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. तसेच या संबंधीचा प्रस्तावास मान्यता मिळाल्यानंतर या भागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना इतर प्रभाग समित्यांमध्ये वर्ग करण्यात येणार आहे. तसेच मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रातील रस्ते सफाईकरिता सध्या मागविण्यात आलेली निविदाही रद्द करण्यात येईल, असे महापालिका प्रशासनाने प्रस्तावत म्हटले आहे.
वेगळ्या गटांची निर्मिती
साफसफाईच्या खासगीकरणासाठी रेतीबंदर-मुंब्रा मार्केट, मुंब्रा, कौसा-रशीद कंपाऊंड, असे तीन गट करण्यात आले असून तेथील घरांची संख्या, लोकसंख्या, गटारे, रस्ते, दैनंदिन निर्माण होणारा कचरा, प्रसाधनगृह संख्या, याचा सविस्तर अहवाल प्रशासनाने तयार केला आहे. लोकसंख्या व रस्त्याची लांबी यानुसार प्रत्येक गटासाठी बर्मन कमिटीच्या शिफारशीनुसार हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या धोरणानुसार मुंब्रा विभागासाठी २५७ कामगार अपेक्षित आहेत. सार्वजनिक प्रसाधनगृहाच्या साफसफाईसाठी १५ कामगारांसह या सर्व परिसराच्या सफाईसाठी २९६ कामगारांची आवश्यकता भासणार आहे. हे सर्व कामगार खासगीकरणाच्या माध्यमातून भरले जाणार आहेत.
मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रातील दैनंदिन साफसफाईचे काम कंत्राटी पद्धतीने करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंब्रा भागात सध्या कार्यरत असलेले २२७ सफाई कामगार इतर वळविले जाणार आहेत. तसेच महापालिका कर्मचाऱ्यांसाठी येणाऱ्या खर्चाच्या तुलनेत कंत्राटी पद्धतीमुळे ३४.८५ टक्के महापालिकेच्या खर्चात बचत होणार आहे, असा दावाही महापालिका प्रशासनाने प्रस्तावात केला आहे.