उरणकरांची तहान भागवणाऱ्या रानसई धरणातील गाळ काढण्याचा निश्चिय एमआयडीसीने केला असून यासंदभाईत प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. तब्बल ४६ वर्षांनंतर पहिल्यांदाच या धरणातील गाळ काढला जाणार आहे. यामुळे धरणातील पाणीसाठय़ाच्या क्षमतेत वाढ होणार आहे. त्याचप्रमाणे धरणातील पाणी शुद्धीकरण केंद्राचेही नूतणीकरण करण्यात येणार असल्याने नागरिकांना शुद्ध पाणी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
केंद्र शासनाने या ठिकाणी उभारलेल्या नौदलाच्या शस्त्रागारासाठी पाण्याची आवश्यकता असल्याने १९६९ साली एमआयडीसीच्या माध्यमातून उरण तालुक्यातील रानसई परिसरातील १५ स्क्वेअर किलोमीटर जागेवर या धरणाची उभारणी करण्यात आली. तालुक्यातील २३ ग्रामपंचायती व औद्योगिक विभागाला या धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. धरणाची स्थापित क्षमता १० दशलक्ष घनमीटर इतकी आहे. मात्र गेल्या ४६ वर्षांत धरणातील गाळ न काढल्याने ही क्षमता ८ दशलक्ष घनमीटरवर आली आहे. इपाटय़ाने नागरीकरण झालेल्या या तालुक्याला वर्षांला दहा दशलक्ष घनमीटर पाणी लागेत. त्यामुळे दर वर्षी उन्हाळ्यात एमआयडीसीला दोन दशलक्ष घनमीटर पाणी उसने घ्यावे लागत आहे. यावर उपाय म्हणून धरणातील गाळ काढण्याचा निर्णय एमआयडीसीने घेतला आहे. यासाठी आवश्यक परवानगी आणि आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने अधिकारीवर्ग कामाला लागला आहे. त्याचप्रमाणे धरणातील गाळ व घाण काढण्यासाठी सेन्ट्रल वॉटर प्रीझर्व रिसोर्सेस स्कीम (सीपीडब्लूआरएस) यांच्या मार्फत धरणाचा सव्‍‌र्हे करून तसेच धरणाच्या गाळ काढण्याच्या कामावर सीसी टीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येणार आहे. धरणातील गाळ काढल्यानंतर एमआयडीसीला उरणच्या नागरीवस्तीला तसेच औद्योगिक विभागाला पाणीपुरवठा करण्यासाठी करावी लागणारी उसनवारीची कसरत थांबणार आहे. तसेच उरणमधील नागरिकांची अनेक वर्षांची धरणाची उंची वाढविण्याचीही मागणी पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.

उरण तालुक्यात साधारणत तीन ते साडेतीन हजार मिलिमीटर पावसाची नोंद होते. पावसाळा सुरू झाल्यानंतर अवघ्या महिन्याभरातच एक हजार ते बाराशे मिलिमीटर पावसाने रानसई धरण भरून वाहू लागते. त्यामुळे पुढील तीन महिने धरण परिसरात पडणाऱ्या पावसाने धरण भरून वाहू लागते. हे पाणी खाडीवाटे समुद्रात वाहून जाते. यासाठी धरणातील गाळ काढावा तसेच धरणाची उंची वाढवून धरणाच्या पाणीसाठय़ाच्या क्षमतेत वाढ करावी असा प्रस्ताव मागील पंधरा वर्षांपासून पडून आहे. याचे मुख्य कारण म्हणजे वनविभागाची न मिळालेली परवानगी तसेच शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाची समस्या आहे. यावर आपण मार्ग काढून काही महिन्यांतच धरणातील गाळ काढण्याचे काम सुरू होणार आहे. तसेच धरणाची उंची वाढविण्याचाही नवा प्रस्ताव तयार करून वरिष्ठ विभागाकडे पाठविण्यात येणार आहे. भविष्यात रानसई धरणातील शुद्धीकरण प्रकल्पातही सुधारणा करण्यात येणार असल्याने अशुद्ध पाण्याच्या समस्याही दूर होईल.