गेल्या  ३७ वर्षांपासून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जीर्ण इमारतीत गोंदिया पालिकेचे स्थायी ५७ सफाई कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय वास्तव्यास आहेत. मात्र, वसाहतीच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष करून पालिकेने खोल्यांचे भाडे दहा वर्षांपासून दिलेले नाही. परिणामी, भौतिक सुविधांचा अभाव व जीर्ण इमारती यामुळे त्यांचा जीव टांगणीला आला आहे.
पालिकेने २००३-०४ पासून कर्मचाऱ्यांना वसाहतीची सोय म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीकडून ५७ खोल्या भाडे तत्वावर घेतल्या. दरमहा सहाशे रुपये भाडे असलेल्या या जीर्ण इमारतीत ५७ कर्मचारी कुटुंबासह वास्तव्यास आहेत. परंतु, या  इमारतींचे भाडे अनेक दिवसांपासून पालिका प्रशासनाने दिलेले नाही. ३७ वर्षांपासून पालिकेतील सफाई कर्मचारी या इमारतींमध्ये राहत असून त्यांचा जीव तेथे टांगणीला लागलेला आहे. वसाहतीतील इमारतींची सफाई, रंगरंगोटी तर सोडाच साधी डागडुजीसुद्धा करण्याची गरज पालिका प्रशासनाला वाटली नाही. वसाहत निर्माण होऊन १० वर्षांंचा कालावधी लोटला. परंतु, ६०० रुपये महिना असे अत्यल्प भाडे असणाऱ्या या खोल्यांची पालिकेच्या दुर्लक्षामुळे दूरावस्था झाली असून कर्मचारी आपला जीव मुठीत घेऊन राहत आहेत. विशेष म्हणजे, या इमारतीच्या दुरावस्थेकडे कर्मचाऱ्यांनी अनेकदा पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. परंतु, या समस्येला पालिकेने गंभीरतेने घेतले नाही. उल्लेखनीय असे की, पावसाळ्याच्या सुरुवातीलाच दमदार पावसाने हजेरी लावली. अशा परिस्थितीत जीर्ण इमारती अतिवृष्टीने कधीही क्षतीग्रस्त होऊ शकतात. यामुळे ५७ सफाई कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांचा जीव धोक्यात आला असून, या गंभीर समस्येवर पालिका प्रशासनासह जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे. काही दिवसांपूर्वीच पालिकेतील पक्षनेते पंकज यादव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन पालिकेतील सफाई कामगारांची ही समस्या सोडविण्याची व त्यांना सोयीयुक्त घर देण्याची मागणी केली.