स्वच्छतेविषयी जागरुकता निर्माण व्हावी, यासाठी देशभरातील विविध शहरात मिरवणूक व स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशन, शाखा नागपूरच्या पदाधिकारी व सदस्यांनी धरमपेठ परिसर स्वच्छ करून समाजापुढे वेगळा आदर्श निर्माण केला.
नागपूर शहर हे भारतातील स्वच्छ आणि हिरवाईने नटलेले शहर मानले जाते. मात्र, सध्या शहरात हवेच्या प्रदूषणाची पातळी वाढत आहे. पर्यावरणीय आजारांचे दडपण कमी करणे हे प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. सुयोग्य व्यवस्थापन, घरात, तसेच कार्यालयात विषारी द्रव्यांचा वापर टाळणे, घरगुती पाणीसाठा सुरक्षित ठेवणे, अधिक उत्तम आरोग्य उपाययोजना, अशा छोटय़ा उपायांमधून आपल्याला भारत स्वच्छ व स्वस्थ राखण्यास दीर्घकाळ मदत होईल, असे प्रतिपादन आशा हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रवीण सलमानंद आणि डॉ. उषा वांजळकर यांनी याप्रसंगी केले.
या मोहिमेत आयएमएच्या नागपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. विजय काटे, उपाध्यक्ष डॉ. आशिष दिसवाल, डॉ. सुभाष ढवळे, कोषाध्यक्ष डॉ. जे.आर. मालानी, माजी अध्यक्ष डॉ. संजय देशपांडे, सचिव डॉ. कुश झुनझुनवाला, डॉ. शंकर खोब्रागडे, डॉ. अभिजित अंबईकर, डॉ. अविनाश वासे आदी डॉक्टर्स सहभागी झाले होते. रोगप्रतिबंधासाठी जनजागृती हे पहिले पाऊल आहे. आरोग्य आणि स्वच्छता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. पर्यावरणाला आपण प्रदूषणापासून मुक्त ठेवले तर आरोग्याची पातळी उंचावेल. या चळवळीत सहभागी होण्यासाठी आणि स्वच्छ भारत व रोगमुक्त देश करण्यासाठी प्रत्येक नागरिकांना आम्ही आवाहन करत आहोत, असे मत इंडियन मेडिकल असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मरतड पिल्लई व सचिव डॉ. के.के. अग्रवाल यांनी व्यक्त केले आहे. अल्केम लेबॉरटरीज आणि इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘क्लिन इंडिया’ राष्ट्रीय मोहिमेत देशभरातील १३५ मोठय़ा शहरात मोठय़ा संख्येने नागरिक सहभागी झाले होते.