मुंबईत अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांना शिस्त लावणारे क्लिन अप मार्शल तैनात करण्यासाठी महापालिकेला आणखी किमान एक महिना प्रतीक्षा करावी लागणार आहे. क्लिन अप मार्शल योजनेसाठी निवड झालेल्या संस्थांची पोलीस पडताळणी सुरू असल्यामुळे या योजनेची अद्याप अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. येत्या महिन्याभरात सर्व प्रक्रिया पूर्ण होईल आणि अस्वच्छ मुंबईकरांना शिस्त लावण्यासाठी क्लिन अप मार्शल सज्ज होतील, असा विश्वास पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
पान खाऊन भिंती रंगविणारे, सिगारेट-विडीची थोटके वाटेल तेथे फेकणारे, उघडय़ावरच प्रातर्विधी उरकणारे, वाहने धुणारे तसेच बेशिस्तपणे कचरा फेकणाऱ्या मुंबईकरांना वेसण घालण्यासाठी मुंबई महापालिकेने ‘क्लिन अप मार्शल’ योजना सुरू केली होती. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे क्लिन अप मार्शलचा मुंबईकरांनी धसका घेतला होता. मात्र कालौघात नगरसेवकांनी क्लिन अप मार्शलवर आक्षेप घेण्यास सुरुवात केली. अखेर मुदत संपुष्टात येताच पालिका प्रशासनाने ही योजना बासनात गुंडाळली. त्यानंतर अस्वच्छता करणारे नागरिकांचा बेतालपणा वाढू लागला.
दरम्यानच्या काळात मागणी वाढू लागल्यामुळे ही योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय पालिकेने घेतला असून पूर्वीच्या तुलनेत त्यात काही फेरबदलही करण्यात आले आहेत. या योजनेसाठी २० संस्थांची निवड करण्यात आली असून संस्थाचालकांना मुंबईकरांवर नजर ठेवण्यासाठी लोकसंख्येच्या तुलनेत २० ते २५ कर्मचारी नियुक्त करावे लागणार आहेत. या संस्था आणि संस्थाचालकांच्या पडताळणी करण्याचे काम १४ एप्रिल रोजी पोलिसांवर सोपविण्यात आले आहे. येत्या १५ दिवसांनी पोलिसांचा अहवाल अपेक्षित आहे. त्यानंतर उर्वरित सोपस्कार पूर्ण करून या योजनेची अंमलबजावणी करण्याचा मानस आहे. पोलिसांनी आपला अहवाल वेळेवर सादर केला, तर एक महिन्यात ही योजना अंमलात येईल आणि अस्वच्छता करणाऱ्या मुंबईकरांना पुन्हा एकदा वेसण घालणे पालिकेला शक्य होईल.

या योजनेची अंमलबजावणी होताच मुंबईचा उकीरडा करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. गुन्हा आणि दंडाचे स्वरुप पुढीलप्रमाणे-

गुन्ह्याचे स्वरुप                           दंड

रस्त्यात लघुशंका करणे          २०० रुपये
थुंकणे                                        २०० रुपये
उघडय़ावर स्नान करणे           १०० रुपये
उघडय़ावर शौचास बसणे         १०० रुपये
उघडय़ावर प्राण्यांना भरवणे    ५०० रुपये
रस्त्यावर गाडी धुणे                 १००० रुपये
रस्त्यात धुणी-भांडी करणे      २०० रुपये