दहावी, बारावीची परीक्षा दिल्यानंतर करिअर म्हणून कुठला पर्याय स्वीकारावा याबाबत न मागताही मार्गदर्शन करणारी अनेक मंडळी सभोवताली आहेत. मात्र अपेक्षित अभ्यासक्रमाला प्रवेश घेत असताना आपली बौद्धिक क्षमता, प्रवेशाची तयारी कशी करावी, अभ्यासक्रम, यांची एकत्रित माहिती देणारे ‘क्लिक फॉर अ‍ॅडमिशन’ अ‍ॅप नाशिकच्या आनंद शिरसाठ यांनी तयार केले आहे. ही प्रणाली भ्रमणध्वनी व वेब पोर्टलवर मोफत उपलब्ध आहे.
दहावी, बारावी परीक्षेचा निकाल लागल्यानंतर प्रवेशासाठी विद्यार्थी व पालकांचा होणारा गोंधळ नेहमीचाच आहे. प्रवेश प्रक्रिया कशी चालते याची माहिती मिळण्यासाठी ही संगणकीय प्रणाली आनंदने विकसित केली. त्यात सर्व महाविद्यालयांची माहिती विद्यापीठ व जिल्ह्यानुसार विभागलेली असल्याने समजणे सोपे जाते.
त्यात राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्त्राच्या १४ विद्यापीठांतर्गत येणाऱ्या १५०० महाविद्यालयांची माहिती आहे. महाविद्यालयांचा सांकेतांक, नाव, विभाग, छायाचित्र, काही बदल, कोणते अभ्यासक्रम, प्रशिक्षण उपलब्ध आहे त्यांचा संकेतांक, उपलब्ध जागा, महाविद्यालयाविषयी संक्षिप्त माहिती, पत्ता, दूरध्वनी क्रमांक, संकेतस्थळ, जायचे कसे याविषयी माहिती देण्यात आली आहे. मागील वर्षीच्या ‘कॅप राऊंड’ तसेच ‘कट ऑफ’बद्दलची माहिती देण्यात आली आहे.
या शिवाय, विद्यार्थ्यांच्या मनावर या सर्वाचा ताण येऊ नये म्हणून अ‍ॅपमध्ये यशस्वी व्यक्तींचा जीवन परिचय करून देण्यात आला आहे.
त्यात बाबा आमटे, सुधा मूर्ती, अमिताभ बच्चन, धीरूभाई अंबानी, सुनील खांडबहाले आदींचा समावेश आहे. तसेच करिअर विभागात विविध अभ्यासक्रमांची माहिती समाविष्ट करण्यात आली आहे. कला, वाणिज्य आणि विज्ञान या शाखेसह औषधनिर्माण शास्त्र, व्यवस्थापन, लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षांची माहिती, प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे याच्या माहितीविषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे. विद्यार्थी व पालकांनी या नि:शुल्क सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिरसाठ यांनी केले आहे.

अ‍ॅप वेळोवेळी अद्ययावत होणार
ही सर्व माहिती संकलनासाठी १५ हजारांहून अधिक संकेतस्थळांचा अभ्यास करण्यात आला. १३० दिवसांचा कालावधी यासाठी लागला. मात्र माहितीचे बदलते स्वरूप आणि उपलब्ध होणारे नवीन पर्याय पाहता ही प्रणाली वेळोवेळी अद्ययावत होत राहील. अ‍ॅप मिळवण्यासाठी ९५९५८ ४५०३९ क्रमांकावर व्हॉट्सअ‍ॅपवरून संदेश पाठविल्यास संपूर्ण माहिती, प्लेस्टोर व वेब लिंक मिळू शकते.