डोंबिवलीतील टपाल कार्यालयांमध्ये ग्राहकांना वेगवेगळ्या सेवा पदरात पाडून घेताना बरीच कसरत करावी लागत असून या अनागोंदीमुळे ग्राहक तसेच एजंट अक्षरश हैराण झाले आहेत. राष्ट्रीय बचत योजनेचे अर्ज तसेच मुद्रांक तिकीट वेळेवर मिळविण्यात येणाऱ्या अडचणी, मुदत ठेवीच्या रकमा मिळण्यात होत असलेला विलंब यामुळे ग्राहक संतापले आहेत. या कार्यालयात एकाच कर्मचाऱ्याकडे दोन ते तीन पदभार असल्याने कार्यालयात एकाच खिडकीवर ग्राहकांची झुंबड उडू लागली असून त्यामुळे या कार्यालयात दलालांना सुगीचे दिवस आले आहेत.
टपाल कार्यालयातील अनागोंदी कारभाराविषयी उघडपणे आवाज उठवला तर त्याची दखल घेतली जात नाही म्हणून ग्राहक गप्प आहे. आपल्या कामावर प्रतिकूल परिणाम होईल म्हणून हा वर्गही उघडपणे बोलण्यास तयार नाही. शहरात सहा टपाल कार्यालये आहेत. त्यांची पूर्ण दुर्दशा झाली आहे. कर्मचाऱ्यांना बसण्याएवढी मुबलक जागा कार्यालयांमध्ये नाही. स्वच्छतागृह नाहीत. काही ठिकाणी सुविधा आहेत तर तेथे पाण्याची सुविधा नाही. रामनगर टपाल कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सार्वजनिक स्वच्छतागृहाचा वापर करावा लागतो. येथे महिला कर्मचाऱ्यांची सर्वाधिक कुचंबणा होते. पिण्याचे पाणी शेजाऱ्यांकडून आणले जाते. विष्णुनगर टपाल कार्यालय इमारत धोकादायक झाली आहे. फडके रस्ता, मानपाडा, एमआयडीसी, टिळकनगर टपाल कार्यालयांची पडझड झाली आहे.
 ग्राहक वाऱ्यावर
काही टपाल कार्यालयांमध्ये तर ग्राहकांना कार्यालयात उभे राहण्यासही जागा नाही. ग्राहक टपाल कार्यालयाबाहेरील कट्टय़ावर बसून टपाल सेवा घेत असल्याचे चित्र आहे. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रांचे अर्ज टपाल कार्यालयात उपलब्ध नाहीत. एक अर्ज असतो त्या ग्राहकाला दहा ते २० झेरॉक्स प्रती काढण्यास सांगितल्या जातात. १० हजार, ५ हजार रुपयांची राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे टपाल कार्यालयात अनेक दिवस उपलब्ध नसल्याने ग्राहकांना ५०, १०० रुपयांची ‘एनएससी’ प्रमाणपत्रे घेण्यास भाग पाडले जाते. प्रमाणपत्रांचे हे गठ्ठे ठेवायचे कोठे आणि सांभाळायची कशी असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. एवढय़ा प्रमाणपत्रांवर सही करताना कोठे सही मागेपुढे झाली तर हेच टपाल कार्यालय पैशासाठी आपणास अडवेल अशी भीती ग्राहकांना आहे. ‘किसान विकास पत्रा’च्या फाइल्स सुधारित नोंदीसाठी ठाणे येथे पाठवल्या जातात. या नस्ती येईपर्यंत ग्राहकांना एक-एक महिना टपाल कार्यालयात आपली गुंतवणूक मिळवण्यासाठी चकरा माराव्या लागतात. धनादेशाद्वारे बचत खात्यात गुंतवणूक केल्यास बचतीचे प्रमाणपत्र येण्यास एक महिना उशीर लावला जातो, असे ग्राहकांकडून सांगण्यात येते.  
गोंधळलेला कर्मचारी
टपाल कार्यालयात पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्याने एक टपाल कर्मचारी एका खिडकीवर मनीऑर्डर, रजिस्टर घेतो तसेच टपाल एजंटना सेवा देतो. तिकिटे तसेच इतर सामुग्री विक्री करतो. त्यामुळे गोंधळलेला हा कर्मचारी ग्राहक, एजंटवर अनेक वेळा संतप्त होताना दिसतो. सकाळी दहा वाजता टपाल कार्यालये उघडतात. सकाळी ११ ते ११.३० या वेळेत टपाल कार्यालयात मुख्य कार्यालयातून रोख रक्कम येणे आवश्यक असते. अनेक वेळा दुपारचे १२ वाजून जातात, तरीही रोख रक्कम येत नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना ताटकळत बसावे लागते. टपाल एजंटना कार्यालयातील कामे करा, मग तुमची कामे झटपट करू, असे सांगून कामाला जुंपले जाते. ग्राहकाने टपाल कार्यालयात येऊन त्याची गुंतवणूक घेऊन जाणे आवश्यक असते. अनेक एजंट ग्राहकांचे मध्यस्थ म्हणून काम करून टपाल अधिकाऱ्यांच्या संगनमताने कामे करून घेतात. प्रामाणिक एजंट मात्र रांगेत उभे राहून सेवा घेत असतात, अशा तक्रारीही पुढे येत आहेत.