गलेलठ्ठ पगाराची नोकरी. भौतिक सुखांची जंत्री. भवितव्याची चिंता नाही.. पण हे सर्व सोडून समाजातील दु:खाची धग कमी व्हावी, या एकाच उदात्त हेतूने सामाजिक कामाचा आगळा कित्ता विश्वास मोमले या तरुणाने समोर ठेवला. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल िक्लटन यांनी या कार्याची दखल घेऊन त्याला फेलोशिप देऊन सन्मानित केले. विश्वासचा हा बहुमान लातुरात कौतुकाचा विषय झाला आहे.
जिल्ह्य़ातील मुरंबी (तालुका चाकूर) येथील शेतकरी कुटुंबातून आलेल्या विश्वासने लातूरला राजर्षी शाहू महाविद्यालयात विज्ञान पदवी मिळविली. प्रा. शेषेराव मोहिते आदींचे त्याला मार्गदर्शन मिळाले. २००० मध्ये टेक मिहद्रा कंपनीत नोकरी मिळाली. नोकरीत भरभराट झाली. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, मलेशिया, युरोप आदी देशांत कंपनीच्या कामानिमित्त दौरे झाले. पण खेडय़ातून आलेल्या विश्वासला ग्रामीण जीवन, दारिद्रय़, शोषण या विषयांनी अस्वस्थ करून सोडले. आíथक दरी, वर्णभेद, जातिभेद, व्यवसायावरून भेद या बाबींनी तो त्रासून गेला. त्यामुळेच विविध विषयांचा अभ्यास करायचा, या ध्यासाने पुण्यातील स. प. महाविद्यालयात नोकरी करीत अर्थशास्त्र विषय घेऊन बी. ए. ला प्रवेश घेतला. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये समाजासाठी काही करण्याची भावना निर्माण करणारा गट त्याने उभा केला. या विद्यार्थ्यांची पहिली सहल जुन्नर तालुक्यातील गटातल्याच एका विद्यार्थ्यांच्या शेतावर नेली.
जळगाव जिल्हय़ातील मॅगसेसे पुरस्कार विजेत्या नीलिमा मिश्रा यांच्या गावात जाऊन त्यांचे काम कसे चालते याचा अभ्यास या गटाने केला. समाजातील प्रश्न सोडवण्यास मदत करताना ती भावनिक पातळीवरची न होता तर्कशुद्ध विचारांवर असावी, असा विचार करून विश्वासने माध्यम नावाची स्वयंसेवी संस्था गेल्या ऑक्टोबरमध्ये सुरू केली. टेक मिहद्रासारख्या नामवंत कंपनीतील १२ वर्षांची नोकरी सोडली व पूर्णवेळ संस्थेचे काम करण्याचे ठरवले. पुण्यातील देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या वस्तीचा अभ्यास करून पुणे विद्यापीठाला अहवाल सादर केला. कोणताही बदल शिक्षणातून होतो, बदल वृत्तीत झाला नाही तर कृतीत उतरत नाही. त्यामुळे शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले. पानशेतजवळील रचना वसतिगृहातील शालेय विद्यार्थ्यांसंबंधाने काही प्रयोग सुरू केले. या दरम्यान, विल्यम िक्लटन फेलोशिपबद्दल माहिती मिळाल्यावरून त्यासाठी अर्ज केला. दक्षिण किंवा ईशान्य भारतात शिक्षण, पर्यावरण यापकी एका विषयावर वर्षभर कामाची संधी विश्वासला या संस्थेकडून मिळणार आहे. आपल्या गरजा कमी करून समाजास अधिक वेळ देता यावा, या साठी विश्वासची धडपड आहे.