महसूल कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी सुरू केलेला बेमुदत संप सोमवारी चौथ्या दिवशीही सुरूच होता. कर्मचारी संपावर असल्याने जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयांत शुकशुकाट जाणवत होता.  जिल्ह्यातील जवळपास २३० कर्मचारी सहभागी झाले आहेत. उद्या (मंगळवारी) महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी राज्य महसूल संघटनेचे पदाधिकारी चर्चा करणार आहेत. यानंतरच आंदोलनावर तोडगा निघणार आहे.
लिपिकांचे पदनाम बदलून महसूल सहायक असे द्यावे, महसूल कर्मचाऱ्यांवरील वाढते हल्ले लक्षात घेऊन हल्लेखोरांना कठोर शिक्षा करणारा कायदा करावा, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या एका पाल्यास शासनसेवेत सामावून घ्यावे, वाहनचालकांचे जादा कामाचे भत्ते वेळोवेळी द्यावेत, नायब तहसीलदारांची पदे लोकसेवा आयोगाकडून न भरता पदोन्नतीने भरावीत, मंडळ अधिकारी व अतिरिक्त कारकून श्रेणींच्या कर्मचाऱ्यांमध्ये ३:१ या प्रमाणानुसार नायब तहसीलदार श्रेणीची पदोन्नती द्यावी आदी मागण्यांसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी १६ ऑगस्टपासून बेमुदत संप पुकारला. राज्यभरात आंदोलन सुरू असून परभणी जिल्हा महसूल संघटनेचे कर्मचारीही यात सहभागी झाले आहेत. संपामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासह इतर विभागीय कामकाजावर परिणाम झाला आहे.
दरम्यान, संपावर तोडगा काढण्यासाठी उद्या महसूलमंत्री थोरात यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना चच्रेसाठी बोलविले आहे. चच्रेत मागण्या मान्य झाल्यास संप मागे घेण्यात येईल, अन्यथा संप पुढे चालू राहील, असे जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दत्ता गिनगिने यांनी सांगितले. संपात वाहनचालक, कोतवाल, चतुर्थ श्रेणी, लिपिक आदी कर्मचारी सहभागी झाले आहेत.