इचलकरंजी येथे कापड व्यापाऱ्याच्या इमारतीमध्ये लागलेल्या आगीत फर्निचर, प्रापंचिक साहित्य भस्मसात झाले. आगीमध्ये सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद गावभाग पोलिसांमध्ये झाली आहे.     
निरामय हॉस्पिटलसमोरील नितीन कृष्णा डाके यांची दुमजली स्लॅबची इमारत आहे. त्यांचा कापडाचा व्यापार असल्याने विविध प्रकारचे कपडे इमारतीमध्ये ठेवले असतात. दुपारी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून धूर येत असल्याचे परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आले. डाके कुटुंबीयांनी वरच्या मजल्यावर जाऊन पाहणी केली असता शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे दिसून आले. नागरिकांनी धावाधाव करून घरातील साहित्य अन्यत्र हलविले. घटनेची माहिती कळताच अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. तासाभराच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. आगीत फर्निचर, पुस्तके, लॅपटॉप, कॉम्प्युटर, प्रापंचिक साहित्य यांचे मोठे नुकसान झाले. घरातील तयार कपडय़ांना आगीची झळ बसली नाही.