उपराजधानीला प्रथमच देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने राज्याचे नेतृत्त्व करण्याची संधी मिळाल्याने, या नेतृत्त्वाशी कशी आपली जवळीक आहे हे दाखवण्यासाठी अनेकांमध्ये अहमहमिका लागली आहे. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून जो तो नव्या मुख्यमंत्र्यांसोबतचे जुने छायाचित्र टाकत आहेत. आज जेव्हा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली, तेव्हा फेसबुकवर जणू ‘मुख्यमंत्री आणि मी’ अशीच छायाचित्रांची स्पर्धा रंगली होती.

देवेंद्र फडणवीस यांच्यातील सामान्यातले असामान्यपण साऱ्यांनाच ठाऊक आहे. प्रत्येकाशी त्यांचे मिळून मिसळून आणि आपुलकीने वागणे अनेकांनी त्यांच्या कॅमेऱ्यातही कैद केले आहे. ‘आपण आणि आपला आमदार’ अशीच भावना त्यावेळी होती. सर्वसामान्य माणूसच नव्हे तर डॉक्टर, प्राध्यापक, विद्यार्थी, संशोधक अशा साऱ्यांसोबत या ‘मॉडेल आमदारा’ने कधीकाळी दिलेली ‘पोझ’ आता ‘मॉडेल मुख्यमंत्री’ म्हणून फेसबुक, ट्विटर आणि वॉट्सअ‍ॅपवर फिरत आहे. देवेंद्र फडणवीसांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी घेतले जाऊ लागल्यानंतरच अनेकांनी त्यांच्या पोतडीतली छायाचित्रे बाहेर काढायला सुरुवात केली. फडणवीसांचे मुख्यमंत्रीपदाचे वारे वेगाने वाहू लागल्यानंतर ही छायाचित्रेसुद्धा वाऱ्याच्या वेगाने सोशल मीडियावरून फिरू लागली. फडणवीसांच्या प्रचारादरम्यानची त्यांच्यासोबत कधीकाळी कुठल्या कार्यक्रमातील बोलताना, जेवताना, फिरताना, खांद्यावर हात ठेवून असलेली छायाचित्रे कार्यकर्ते, नगरसेवक, ओळखीचे आदींनी टाकली आहेत. यात प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आणि छायाचित्रकारसुद्धा मागे नाहीत. अधिवेशनकाळातील फडणवीसांसोबतचा प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधी आणि छायाचित्रकारांचे अनेक छायाचित्र सोशल मीडियावर आहेत.
मित्रांसाठी मित्र बनून वावरणारा देवेंद्र आज मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेकांनी प्रसारमाध्यमांसमोर त्यांच्या आठवणींची पोतडी उघडली. त्या पोतडीतून अनेक गुपितही बाहेर पडली. यात फडणवीसांच्या बॅक बेंचपासून तर त्यांच्यासोबत विजय सुपर या दुचाकीवर बसून केलेल्या प्रवासाचा उलगडा आहे.
गाडीत बस आणि चल म्हणणारा देवेंद्र कसा दोन दोन दिवस एकाच कपडय़ावर बाहेर राहयचा, अशा अनेक आठवणी त्यांच्या मित्रांनी उलगडल्या आहेत.