जागतिक पाणथळ जागा संवर्धन दिनाच्या निमित्ताने सोमवारी ऐरोली येथील खाडीकिनाऱ्यावर आलेले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणतीही भाषणबाजी न करता थेट खारफुटीच्या जंगलात मारलेला फेरफटका, जैवविविधता वाढण्यास हातभार लावणाऱ्या खेकडय़ांची पैदास व्हावी म्हणून शंभरएक खेकडय़ांची पिल्ले कांदळवनास अर्पण, खारफुटीची लागवड अशा वेगळ्या कार्यक्रमामुळे मुख्यमंत्र्यांचा पर्यावरणविषयक असलेला दृष्टिकोन सर्वाच्याच लक्षात राहिला. त्यामुळे खारफुटीची लागवड आणि खेकडय़ांच्या पैदासीला हातभार लावणारे ते बहुधा पहिले मुख्यमंत्री असावेत.
नवी मुंबईतील वाशी व ऐरोली येथील कांदळवनांना भेटी देण्यास मुख्यमंत्री येणार असल्याची चर्चा गेली चार दिवस होती, मात्र त्यांचा दिवस नक्की होत नसल्याने सर्वाचाच जीव टांगणीला लागला होता. पहाटे दीड वाजता काही शासकीय अधिकारी व पोलिसांना मुख्यमंत्री सोमवारी नवी मुंबईत येत असल्याचे संदेश गेले आणि शासकीय यंत्रणेची एकच तारांबळ उडाली. मुंबईच्या सागरी सुरक्षेचा आढाव घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हॉवरक्रॉफ्टने समुद्रपाहणी केल्यानंतर ते थेट वाशी येथे आले. त्यानंतर वनविभागाने विकसित केलेल्या खारफुटी नर्सरीला भेट देण्यासाठी ऐरोली गाठली. ते येणार याचा फारसा गवगवा न झाल्याने स्वागतालाही तशी बेताचीच गर्दी होती. स्थानिक कोळी बांधवांना सकाळी अचानक पोलीस बंदोबस्त लागल्यानंतर कल्पना आली आणि त्यांनी व्हॉट्सअ‍ॅपद्वारे लागलीच आपल्या बांधवांना निरोप दिला. त्यामुळे काही आगरी कोळी बांधव आवर्जून उपस्थित राहिले होते. औपचारिक खारफुटी लागवड वगैरे झाल्यानंतर वनविभागाने मुख्यमंत्र्यांच्या छोटेखानी कार्यक्रमासाठी मंडप उभारला होता, पण तेथे न जाता त्यांनी थेट खाडीकिनाऱ्याच्या शेवटच्या टोकापर्यंत जाणे पसंत केले. स्थानिक आमदार संदीप नाईक यांच्या स्वागतानंतर त्यांनी खाडीत वनविभागाने उभारलेल्या लाकडी जेट्टीवरून खारफुटीच्या जंगलाचा एक फेरफटका मारला. ही जेट्टी लाकडाची असल्याने ती तुटण्याची शक्यता अधिक होती. त्यात मुख्यमंत्र्यांचा सुरक्षा ताफा, त्यांचे सचिव यांचे वजन जेट्टीवर वाढले होते. त्यामुळे पोलीस आयुक्त के. एल. प्रसाद यांचा जीव टांगणीला लागला. खारफुटी तोडीवर मुंबई उच्च न्यायालयाने बंदी घातल्यानंतर ठाणे खाडीकिनारी मोठय़ा प्रमाणात खारफुटी वाढली आहे. त्यामुळे हिंस्र प्राणी, साप यांचे प्रमाण वाढले असल्याने शक्यतो अशा जंगलात आता कोणी जाण्यास धजावत नाही. मात्र मुख्यमंत्री जेट्टीच्या शेवटच्या टोकापर्यंत जाऊन आले. या जेट्टीच्या उजव्या बाजूस असलेल्या कांदळवनात मुख्यमंत्र्यांनी चक्क खेकडय़ांची पिल्ले सोडली. ही तामिळनाडूवरून आणलेली पिल्ले होती. त्यांची पैदास होऊन सात-आठ महिन्यांनंतर भले मोठे झालेले खेकडे पंचतारांकित हॉटेल्समध्ये एक ते दीड हजार रुपयांना विकले जाणार आहेत. त्यांच्या संवर्धनाची जबाबदारी स्थानिक प्रकल्पग्रस्तांना देण्यात आली आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्याच्या हस्ते एका खारफुटीची लागवड करण्यात आली. त्यामुळे खारफुटीच्या जंगलात फेरफटका, तिची लागवड आणि खेकडय़ांच्या पैदासीला प्रोत्साहन देणारे हे पहिले मुख्यमंत्री असल्याची चर्चा वनविभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये होती.