खंडकऱ्यांच्या जमीन वाटपात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भूमिका महत्वाची ठरली, न्यायालयीन लढाईत त्यांनी मोठे योगदान दिले. दिवाळीपूर्वी जमीन वाटप करण्याचा दिलेला शब्दही पाळला, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.  
खंडकऱ्यांना जमीन वाटप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानवरून थोरात बोलते होते. खंडकरी नेते माधवराव गायकवाड यांची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पेढेतुला करण्यात आली, तर जमिनीचे वाटप होत नाही तोपर्यंत दाढी काढणार नाही, अशी प्रतिज्ञा करणारे खंडकरी कार्यकर्ते रामदास बांद्रे यांच्या दाढीची बट मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चांदीच्या कात्रीने काढण्यात आली. यावेळी उंदिरगाव व माळवाडगाव येथील सुमनबाई गाडेकर, भिमाबाई बोधक, प्रतिभा साठे, सोमनाथ औटी, मच्िंछद्र आसणे, जोसेफ गायकवाड या खंडकऱ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात जमिनीचे सातबाराचे उतारे व मोजणीचा नकाशा देण्यात आला. आमदार भाऊसाहेब कांबळे, सुधीर तांबे, माजी आमदार शिवाजीराव नागवडे, जयंत ससाणे, भानुदास मुरकुटे, ज. य. टेकावडे, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, आयुक्त रविंद्र जाधव, जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार दयाल यावेळी उपस्थित होते.
थोरात म्हणाले, आमदार कांबळे, मंत्री हर्षवर्धन पाटील, ससाणे यांनी या प्रश्नाचा वारंवार पाठपुरावा केला. कामगारांचा प्रश्न आहे. आम्ही आयुष्यात कोणतेही वाईट केले नाही, यापुढे करणार नाही. येत्या हिवाळी अधिवेशनात खंडकऱ्यांना वाटप करण्यात आलेल्या जमिनीवरील नवीन शर्त काढून टाकू. तसेच आकारी पडीत जमीन मालकांचा प्रश्न सोडवू, असे आश्वासन थोरात यांनी दिले.  
कृषिमंत्री विखे यांनी खंडकरी व पाणी प्रश्नावर आतापर्यंत अनेक निवडणुका लढल्या गेल्या. त्याला माजी आमदार भानुदास मुरकुटे साक्षीदार आहेत. लोकांच्या मनात संभ्रम तयार करून बुद्धीभेद करून राजकारण केले गेले. जमीन वाटपाचा इतिहास मोठा आहे. माजी खासदार बाळासाहेब विखे यांच्या प्रयत्नाने राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी कायद्याला संमती दिली. मध्यंतरी अनेक समित्या स्थापन झाल्या. त्यांचे अहवाल आले, ते कागदावर राहिले. परंतु आज शेतकऱ्यांना कागदी सातबारा मिळत आहे.
खंडकरी नेते माधवराव गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जमीन वाटप झाले हा आनंद आहे, असे सांगितले.
यावेळी पालकमंत्री पाचपुते, खंडकरी नेते अण्णासाहेब थोरात, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, दिलीप गांधी, बाळासाहेब विखे आदींची भाषणे झाली. प्रारंभी भाऊसाहेब कांबळे यांनी स्वागत केले. क्षत्रिय यांनी प्रास्ताविक, तर आभार जयंत ससाणे यांनी मानले. सूत्रसंचालन महेश सोनार यांनी केले. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घन:शाम शेलार, अविनाश आदिक, राजेंद्र पिपाडा, सिद्धार्थ मुरकुटे, नगराध्यक्षा राजश्री ससाणे, उपनगराध्यक्ष मुजफ्फर शेख, सभापती सुनिता बनकर, जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, संजय फंड, जी. के. पाटील उपस्थित होते.     
राजशिष्टाचाराविना तोच मान
उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर अजित पवार हे आज पहिल्याच शासकीय कार्यक्रमास हजर होते. मात्र, मुख्यमंत्र्यांसोबत असल्याने त्यांच्या राजशिष्टाचाराचा प्रश्न निर्माण झाला नाही. असा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता त्यांनी घेतली. असे असले तरी कार्यक्रमात त्यांचा दर्जा हा मुख्यमंत्र्यांनंतर दुसऱ्या क्रमांकाचा होता. साधे आमदार असलेले पवार यांना मुख्यमंत्र्यांशेजारी जागा देण्यात आली. मुख्यमंत्र्यांपूर्वी त्यांचे भाषण झाले. उपमुख्यमंत्री पदावर असताना जेवढी राजकीय प्रतिष्ठा मिळत होती तेवढीच राजकीय प्रतिष्ठा त्यांना या कार्यक्रमात देण्यात आली.