उत्तराखंडमधील बेपत्ता भाविकांच्या वारसांना आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, असे आश्वासन राज्यमंत्री सुरेश धस यांनी दिले. या बेपत्ता भाविकांच्या नातेवाईकांनी धस यांची भेट घेऊन आपल्या व्यथा मांडल्या. या वेळी धस यांनी उत्तराखंड मदतकार्यात सहभागी झाल्यानंतरचे आपले अनुभव कथन केले. बेपत्ता नातेवाईकांच्या वारसांना आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी  दिली. बठकीस जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय चौधरी, विभागीय समन्वयक किशोर कुर्हे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
जिल्हय़ात सुवर्ण जयंती राजस्व अभियानाची यशस्वी अंमलबजावणी करण्याचे निर्देशही राज्यमंत्री श्री. धस यांनी दिले. ते म्हणाले,  राज्यात अनेक ठिकाणी सुवर्ण जयंती अभियानामुळे शेतरस्ते, पाणंद मोकळे झाले. त्याचा लाभ परिसरातील शेतकऱ्यांना झाला. परभणी जिल्हय़ातही या अभियानाला गती देऊन त्याची यशस्वी अंमलबजावणी करावी. फेरफार अदालती, विविध प्रमाणपत्रे वाटपाचा तालुकानिहाय कार्यक्रम तयार करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. या वेळी त्यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, गायरान जमिनीबाबत माहिती घेतली. अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखालील तक्रारींबाबत माहिती घेऊन जिल्हयात अशा प्रकरणांबाबत जाणीवजागृती करण्याचे आवाहन त्यांनी केले.
धस यांच्या हस्ते ध्वजवंदन
स्वातंत्र्यदिनी राज्यमंत्री धस यांच्या हस्ते येथे ध्वजवंदन झाले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मुख्य शासकीय कार्यक्रमास आमदार संजय जाधव व मीरा रेंगे, जिल्हाधिकारी एस. पी. सिंह, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. पी. मित्रगोत्री, अतिरिक्त जिल्हाधिकारी संभाजी झावरे, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे, होमगार्डचे जिल्हा समादेशक डॉ. संजय टाकळकर आदी उपस्थित होते. ध्वजवंदनानंतर धस यांनी उपस्थित ज्येष्ठ स्वातंत्र्यसनिकांची भेट घेतली. माजी मंत्री सुरेश वरपूडकर, जि. प. अध्यक्षा मीनाताई बुधवंत, महापौर प्रताप देशमुख, जि. प. उपाध्यक्ष समशेर वरपूडकर, मनपा आयुक्त सुधीर शंभरकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एकनाथ माले आदी उपस्थित होते. धस यांच्याहस्ते नरेगा योजनेअंतर्गत मजुरांना पे स्लीप वितरीत करण्यात आली. लघुउद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या उद्योजकांना जिल्हा पुरस्कार वितरीत करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन नितीन कारखानीस यांनी केले. परभणी शहर महापालिकेचे ध्वजवंदन महापौर देशमुख यांच्या हस्ते झाले. उपमहापौर सज्जुलाला, आयुक्त शंभरकर आदींसह महापालिकेचे सदस्य, कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.