‘थर्टी फर्स्ट’च्या रात्री धुडगुस घालणाऱ्यांनी कहर करत ‘ओली पार्टी’ साजरी करण्यासाठी चक्क सरकारी कार्यालयाचे कुलूप तोडून मद्याच्या बाटल्या फोडत नववर्षांचे स्वागत केले. पार्टीनंतर मटणाच्या तुकडय़ांसह पसारा तसाच टाकून कार्यालयात तसेच परिसरातील काही वाहनांची तोडफोड करून विकृत आनंद साजरा करणाऱ्या चारपेक्षा अधिक जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. विशेष म्हणजे हे सर्वजण एका शासकीय विभागाचे प्रशिक्षणार्थी असल्याने चौकशीनंतर त्यांना समज देऊन सोडण्यात आले.
पंचवटीतील प्रादेशिक परीवहन कार्यालय (आरटीओ) कॉलनी परिसरात सहकार विभागाचे कार्यालय आहे. इमारतीत कृषिसह अन्य पाच विभाग आहेत. परिसरात हाकेच्या अंतरावर पोलीस तसेच सैन्य प्रशिक्षण केंद्र आहे. बुधवारी रात्री उशिराने या केंद्रातील आठ ते दहा प्रशिक्षणार्थीनी ३१ डिसेंबरची ओली पार्टी करण्यासाठी थेट सहकार विभागाचे कार्यालय गाठले. या ठिकाणी सुरक्षा रक्षकाशी हुज्जत घालत त्यांनी कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर प्रवेश केला. यातील एका खोलीचे कुलूप तोडत मद्याच्या बाटल्या बाहेर काढल्या. एकेक घोट पोटात जाण्यास सुरूवात झाल्यावर त्यांचे विमान हळूहळू हवेत जाण्यास सुरूवात झाली. सोबत सामिष जेवणाचा बेत असल्याने प्रत्येक जण वेगळ्याच विश्वात गेला. मग काय आपण कोण आहोत हे विसरून त्यांचा एकच धांडगधिंगा सुरू झाला. रात्री उशिरापर्यंत इमारतीच्या वेगवेगळ्या खोल्यांमध्ये ते फिरत राहिले. काही कार्यालयांच्या काचा फोडत महत्वाच्या दस्तावेजांचा पसारा मांडण्यात आला.
पार्टी आटोपल्यानंतर केंद्राकडे परतत असतांना इमारतीच्या तळमजल्याजवळील दुचाकीचीही तोडफोड करण्यात आली. सोनाली पगारे यांची ही दुचाकी आहे. नववर्षांच्या पहिल्या दिवशी उत्साहाने सकाळी नऊच्या सुमारास कार्यालयात कर्मचारी येऊ लागल्यावर त्यांना कार्यालयाच्या प्रवेशद्वारासह वेगवेगळ्या खोल्यांमध्ये मटणाचे तुकडे पडलेले आढळून आले. काही ठिकाणी मद्याच्या बाटल्या फुटलेल्या अवस्थेत दिसून आल्या. हा प्रकार पाहून हादरलेल्या कर्मचाऱ्यांनी पंचवटी पोलीस ठाणे गाठले. तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी संबंधित प्रशिक्षणार्थीना चौकशीसाठी ताब्यात घेतले. परंतु सर्वसामान्यांना नाहक कायद्याचा धाक दाखविणाऱ्या पोलिसांचा कनवळाूपणा या ठिकाणी उफाळून आला. त्यांनी संबंधितांना प्रेमाची समज देऊन सोडून दिले. या प्रकारानंतर सायंकाळी उशिरापर्यंत केंद्रातील कर्मचारी तसेच काही विद्यार्थी ते आवार स्वच्छ करत होते. पोलिसांनी कोणतीही कारवाई न करता सोडून दिलेल्या या प्रशिक्षणार्थीवर संबंधित केंद्राचे अधिकारी कोणती कारवाई करतात, याकडे लक्ष लागून आहे. अशा घटनांमुळे सरकारी कार्यालयांची सुरक्षितता हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. येथील अपुरे मनुष्यबळ, सुरक्षेच्या दृष्टिने सुरू असलेली चालढकल याचा गैरफायदा काही विघातक वृत्ती घेत आहेत.