*   अजित भुरे यांनी सुचविला मध्यममार्ग
*   पाच वर्षांचा कालावधी वाटून घेण्याचा पर्याय
नाटय़ परिषद नियामक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने समस्त कलाकार मंडळींच्या अब्रूचे धिंडवडे रीतसर निघाल्यानंतर आता आज, रविवारी अध्यक्षपदाच्या निवडीसाठी बैठक होणार आहे. या बैठकीत नाटय़ परिषदेची उरलीसुरली अब्रू शाबूत राहावी आणि अध्यक्षपदाच्या निवडीवर सामोपचाराने तोडगा निघावा, अशी इच्छा नाटय़ परिषद सदस्यांसह सर्वच नाटय़प्रेमी बाळगत आहेत. मात्र यासाठी निर्माता-दिग्दर्शक व कलाकार अजित भुरे यांनी मध्यममार्ग सुचवला आहे. निवडणुकीत मुंबई विभागात दोन्ही पॅनल्सचे प्रत्येकी आठ उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे मतांचा घोडाबाजार न करता या दोन्ही पॅनल्सनी कार्यकाळाची पाच वर्षे समान वाटून घ्यावीत, असा पर्याय त्यांनी पुढे आणला आहे. मात्र दोन्ही गटांकडून या पर्यायाचे स्वागत होण्याची शक्यता अत्यंत धूसर आहे.
नाटय़ परिषदेच्या निवडणुकीत कधी नव्हे तो एवढे वाद-प्रवाद झाले. या आरोप-प्रत्यारोपांमुळे नाटय़ परिषद आणि पर्यायाने कलाकार यांची छि: थू: झाली. आता रविवारी निवडणुकीत निवडून आलेले उमेदवार एकत्र जमून अध्यक्षाची निवड करतील. मुंबई विभागात दोन्ही पॅनल्सचे आठ-आठ उमेदवार निवडून आल्याने अध्यक्षपदासाठी उर्वरित विभागांमधून निवडून आलेल्या उमेदवारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न दोन्ही पॅनल्सनी सुरू केला आहे. या प्रकरणात घोडेबाजार होऊन परिषदेच्या अब्रूचे आणखी धिंडवडे निघू नयेत, यासाठी दोन्ही गटांनी एकत्र येऊन सामोपचाराने मार्ग काढायला हवा, असे भुरे यांचे म्हणणे आहे.
परिषदेचा कालावधी पाच वर्षांचा असतो. दोन्ही पक्षांनी अध्यक्षपदाचा कालावधी विभागून घ्यावा. त्या त्या कालावधीमध्ये त्या त्या गटाच्या अध्यक्षांनी सर्वसहमतीने निर्णय घेऊन विधायक कामे करावीत, असा पर्याय भुरे यांनी सुचवला आहे. त्याहीपुढे जात, यंदा दोन्ही गटांच्या मिळून सहा महिला उमेदवार निवडून आल्या आहेत. प्रत्येक पक्षाने आपल्यातील एका महिला सदस्याचे नाव अध्यक्षपदासाठी सुचवावे. या दोन महिला अध्यक्षांनी प्रत्येकी अडीच वर्षे काम करून नाटय़ परिषदेत स्तुत्य उपक्रम राबवावेत, असेही त्यांनी सुचवले आहे. आपण सुचवत असलेले पर्याय कदाचित आदर्शवादी वाटू शकतील. मात्र परिषदेची प्रतिमा एवढी मलिन झाल्यानंतर एखादा आदर्शवादी निर्णय घेण्यास काहीच हरकत नाही, असे ते म्हणाले.
याबाबत नटराज पॅनलचे प्रमुख विनय आपटे यांना विचारले असता, हा निर्णय घेण्यासाठी आपल्याला इतर उमेदवारांशीही चर्चा करावी लागेल, असा सावध पवित्रा त्यांनी घेतला, तर उत्स्फूर्त पॅनलच्या मोहन जोशी यांनी मात्र हा पर्याय सपशेल धुडकावून लावला. निवडणुकीच्या काळात आमची बदनामी होत असताना कोणाला हा पर्याय का सुचला नाही, असा प्रश्नही त्यांनी विचारला.
दोन्ही पॅनल्सच्या प्रमुखांची ही प्रतिक्रिया लक्षात घेता हे प्रकरण सामोपचाराने तोडगा वगैरे काढण्याच्या पलीकडे गेल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र अध्यक्षपदाच्या निवडीच्या बैठकीत हा पर्याय पुन्हा एकदा मांडण्यात येण्याची शक्यता असून काही ज्येष्ठ उमेदवारांचा त्याला पाठिंबा मिळण्याची शक्यताही आहे.