मोक्का कायद्यांतर्गत अटकेत असलेल्या नागेश मोतीलाल अग्रवाल या बडय़ा कोळसा व्यापाऱ्याच्या बचावासाठी चंद्रपूर जिल्ह्य़ासह विदर्भातील कोळसा लॉबी सक्रीय झाली आहे, तर कोळसा व्यवसायातील या बडय़ा तस्करांना पोलीस वठणीवर आणण्यासाठी चंद्रपूर परिसरातील वेकोलिच्या खाणक्षेत्रात कडक सुरक्षा तैनात करून गस्त सुरू केल्याने व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
‘द ब्लॅक गोल्ड सिटी’ अशी ओळख असलेल्या चंद्रपूर जिल्ह्य़ात वेकोलिच्या २७ आणि कर्नाटक एम्टा व सनफ्लॅगची प्रत्येकी १, अशा २९ कोळसा खाणी आहेत. या सर्व खाणींमध्ये कोळसा तस्करीतून जन्माला आलेले स्थानिक गुंड अर्थात, बाहुबलींचे प्रस्थ आहे. या गुंडांच्या इशाऱ्यावरूनच घुग्घुस, माजरी, भद्रावती, वरोरा, राजुरा, बल्लारपूर व चंद्रपूर परिसरात कोटय़वधीच्या कोळशाची तस्करी चालते. कोळशाने भरलेले ट्रकच्या ट्रक रात्रीतून गायब होतात. ट्रकस्ची चोरी हा तर येथील नियमित व्यापार झालेला आहे. विशेष म्हणजे, या चोरटय़ा व्यापारात अनेक बडी मंडळी गुंतलेली आहेत. दोन वर्षांपूर्वी कोळसा तस्करीच्या याच शीतयुध्दाची परिणती गॅंगवॉरमध्ये झाली होती. चंद्रपूरचा कुख्यात गुंड शेख हाजी सरवर याने राष्ट्रवादीचे चंद्रपूर शहर अध्यक्ष तिरुपती पॉल यांची भरदिवसा मुख्य रस्त्यावर तलवारीने हत्या केली. याचे पडसाद कोळसा तस्करीच्या व्यवसायावर पडले. तिकडे माजरीत मनसेचे नंदू सूर यांची हत्या झाली. येथूनच भाडय़ाचे गुंड पोसून कोळसा तस्करीचा हा व्यापार सुरू झाला. त्याला पोलीस दलाची मदतही मिळाली. त्यामुळेच चंद्रपूर जिल्ह्य़ातील कोळसा खाणींचा परिसर तस्करी आणि गुंडांच्या दहशतीने काळवंडला आहे. त्याला स्थानिक कोळसा व्यापाऱ्यांचीही साथ मिळाली.
ही बाब पोलीस दलाच्या निदर्शनास येताच ही गुंडगिरी व बाहुबलींना समूळ नष्ट करण्यासाठी कारवाईचा ससेमिरा सुरू झाला आहे. यातूनच शेख हाजी शेख सरवर, सरवर रोशन शेख, विवेक ठेंभरे, रमेश ठेंबरे, नागेश अग्रवाल, संजय दुर्गम या पाच जणांविरुध्द घुग्घुस पोलिसांनी मोक्का कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करून अटक केली. मात्र, नागेश मोतीलाल अग्रवाल या कोळसा व्यापाऱ्याने प्रकृती अस्वस्थतेचे कारण समोर करून चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे. कैद्यांच्या वॉर्ड क्रमांक ८ मध्ये त्याच्यावर मधुमेहाचे उपचार सुरू आहेत. मात्र, आरोग्य विभागाच्या मदतीमुळेच त्याला येथे अतिविशिष्ट वागणूक मिळत असल्याची माहिती आहे. हा सर्व प्रकार उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. राजू भुजबळ यांच्या कानावर गेल्यानंतर त्यांनी येथे कडक बंदोबस्त तैनात केला आहे. डॉ. कैलास मेहरा हे आरोपी अग्रवालवर उपचार करीत आहेत. काही दिवसांपूर्वी अशाच एका प्रकरणात यवतमाळ पोलिसांनी आरोपीची मदत करणाऱ्या डॉक्टरवरही मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
येथे डॉ. मेहरा यांना नोटीस बजावून केवळ आरोपीला झालेल्या आजाराची माहिती पोलीस दलाने विचारली आहे. दरम्यान, पोलीस दलाचे पत्र मिळताच आरोपीची सुटका करण्यात आली आहे. या जिल्ह्य़ातील कोळसा खाण परिसरातील संघटीत गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पोलीस दलाने पावले उचलली आहेत. त्यासाठीच घुग्घुस व माजरी येथे २४ तास पोलीस बंदोबस्त तैनात असतो, तर दिवसरात्र गस्त सुरू करण्यात आली आहे. दुसरीकडे कोळसा व्यापारी अग्रवाल यांचा बचाव करण्यासाठी अनेक बडे कोळसा व्यापारी समोर येत आहेत. विशेष म्हणजे, कोळसा व्यापारात गुंतलेले हे सर्व गुंड कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाचे पदाधिकारी किंवा कार्यकर्ते तरी आहेत. त्यामुळे हे गुन्हेगार स्वत:च्या बचावासाठी पक्षाची मदतही घेत असल्याचे समोर आले आहे. कोळशाचा व्यापार अनेकांच्या जीवावर उठला असताना येथे तस्करी करणाऱ्या अनेक टोळ्या सक्रीय आहेत. विशेष म्हणजे, या टोळ्यांचे नेतृत्व करणारे राजकीय पक्षांचे पदाधिकारीच आहेत. आता पोलिसांनी अशा टोळ्यावरही लक्ष केंद्रित केले आहे.