दर कमी करण्यासाठी धावाधाव
* भाजपचे महापौरांना पत्र   * शिवसेनेतही अस्वस्थता  * लोकसभा निवडणुकीमुळे घबराट

सर्वसाधारण सभेत पार्किंग धोरण मंजूर करताना काही सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार मूळ प्रस्तावातील पार्किंगचे दर अमलात आणू नयेत आणि प्रत्यक्ष दरांची अंमलबजावणी स्थानिक नगरसेवक, तसेच नागरी संघटनांना विचारात घेऊन आकारले जावेत, असे ठरविण्यात आले होते. त्यामुळे महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या दरांची आकारणी होणार नाही, असा दावा सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी केला. ठाण्यातील रहिवाशांवर पार्किंग दरांचा बोजा पडणार नाही याची दक्षता घेतली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जयेश सामंत, ठाणे
ठाणे शहरातील जवळपास प्रत्येक रस्ता ‘महागडा’ ठरवत या रस्त्यांच्या कडेला वाहन उभे करताना अवाच्या सव्वा दर आकारण्याचा महापालिकेचा प्रस्ताव लोकसभा निवडणुकीत डोकेदुखी ठरू शकेल हे लक्षात येताच सर्वसाधारण सभेत मंजूर झालेले पार्किंगचे दर प्रत्यक्षात कमी व्हावेत, यासाठी शिवसेना-भाजपमधील नेत्यांची आता धावाधाव सुरू झाली आहे. शहरात ‘पार्किंग धोरण राबवा, दर मात्र कमी करा’, अशी आग्रही भूमिका युतीच्या नेत्यांनी महापौरांकडे मांडली आहे. ठाणे, कळवा, मुंब्रा या तीन शहरांमधील जवळपास १७७ रस्त्यांच्या कडेला वाहने उभे करताना वाहनचालकांना पैसे मोजावे लागणार आहेत. सर्वसाधारण सभागृहात मंजूर झालेल्या धोरणानुसार ठाण्यातील नौपाडा, उथळसर परिसरात जवळपास प्रत्येक रस्त्याच्या कडेला वाहन उभे करताना कळवा, मुंब्य्राच्या तुलनेत जादा पैसे मोजावे लागणार आहेत. दुचाकी वाहनासाठी पहिल्या दोन तासांकरिता २० रुपये, तर चारचाकी वाहनांसाठी ५० रुपये मोजावे लागणार आहेत. पुढे प्रत्येक तासाला यामध्ये वाढ होणार असल्याने सहा तासांसाठी वाहन उभे केल्यास काही ठिकाणी १०० रुपयांची नोट खर्ची पडेल, अशी शक्यता आहे.
नौपाडा, पाचपाखाडी या युतीच्या बालेकिल्ल्यात लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर या दरांची आकारणी सुरू झाल्यास त्याचा फटका  बसेल, अशी भीती काही नगरसेवक व्यक्त करू लागले असून त्यामुळे दरांची आकारणी सदस्यांच्या सूचना विचारात घेऊनच करावी, अशी भूमिका युतीच्या नेत्यांनी घेतली आहे.
ठाण्यातील बाजारपेठा, सरकारी कार्यालये, बँका, शाळा, उद्याने, तलाव अशा गर्दीतील ठिकाणच्या रस्त्यांची रुंदी १८ ते २४ मीटपर्यंत मर्यादित असल्यामुळे या भागातील रस्त्यांच्या कडेला वाहने उभी होताच वाहतुकीची मोठी कोंडी होते, असे सध्याचे चित्र आहे. त्यामुळे या पार्किंगला शिस्ती लागावी तसेच महापालिकेला त्यातून उत्पन्न मिळावे, अशी योजना आखण्यात आली आहे. ठाणे, कळवा, मुंब्रा या शहरांमधील १७७ रस्त्यांची विभागणी अ, ब, क, ड अशा संवर्गात करण्यात आली असून ‘अ’ संवर्गातील रस्त्यांच्या कडेला वाहने उभी करणे सर्वाधिक महागडे ठरणार आहे.
 ठाणे शहरातील नौपाडा आणि उथळसर प्रभाग समितीअंतर्गत येणारे रस्ते ‘अ’ तसेच ‘ब’ वर्गात मोडत असल्यामुळे या भागात वाहने उभे करताना वाहनचालकांना तुलनेने जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. हा सर्व परिसर शिवसेना, भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. कळवा, मुंब्य्राच्या तुलनेत ठाण्यातील रस्त्यांवर वाहने उभी करताना जादा पैसे आकारले गेल्यास स्थानिकांमध्ये रोष निर्माण होईल आणि त्याचा फटका युतीला बसेल, अशी भीती दोन्ही पक्षांतील नगरसेवकांमधून व्यक्त होऊ लागली आहे. महापालिकेत मंजूर झालेले पार्किंग धोरण प्रत्यक्षात येण्यासाठी आणखी तीन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर नौपाडा, पाचपाखाडी भागातील रस्त्यांवर महागडे पार्किंग सुरू झाल्यास काँग्रेस आघाडीच्या नेत्यांना आयता मुद्दा मिळेल. त्यामुळे हे दर कमी करावेत, अशा स्वरूपाची मागणी युतीच्या नगरसेवकांकडून पुढे केली आहे. महापालिकेतील भाजपचे गटनेता संजय वाघुले यांनी महापौर हरिश्चंद्र पाटील यांना यासंबंधी एक पत्र दिले असून दुचाकी तसेच चारचाकी वाहनांना १२ तासांच्या पार्किंगसाठी ३० ते ६० रुपयांपेक्षा अधिक दर आकारणी केली जाऊ नये, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. ठाणेकरांना परवडेल असेच दर आकारले जावेत. धोरण मंजूर करताना ठरविण्यात आलेले दर अन्यायकारक आहेत, अशी भूमिका भाजपने मांडली आहे.