News Flash

चित्रपट निर्मितीतही आघाडीचे गणित

‘लाइफ ऑफ पाय’नंतर अभिनेता इरफान खानकडे समस्त बॉलीवूडजन फार आदराने पाहू लागले आहेत. केवळ सशक्त चित्रपट

| September 15, 2013 01:10 am

‘लाइफ ऑफ पाय’नंतर अभिनेता इरफान खानकडे समस्त बॉलीवूडजन फार आदराने पाहू लागले आहेत. केवळ सशक्त चित्रपट आणि हटके भूमिकांच्या जोरावर पार हॉलीवूडपटावर स्वार होऊन ऑस्करवारीपर्यंत पोहोचलेला इरफान खान पुन्हा एकदा वेगळ्या भूमिके त शिरत आहे. या वेळी ती भूमिका आहे चित्रपटनिर्मात्याची. ‘लंचबॉक्स’ हा चित्रपट सध्या फार चर्चेत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मुलाखती देत असताना ‘आतापर्यंत असं बऱ्याचदा झालं आहे की चांगला चित्रपट केला, पण तो चालला नाही. चांगला चित्रपट करायची इच्छा आहे, पण पैसा नाही म्हणून तो चित्रपट बाहेर आलाच नाही. एखादी भूमिका फार चांगली वाटली म्हणून केली आणि पडद्यावर पाहिल्यावर वाटले, का केली? या सगळ्यातून बाहेर पडून खरोखरच उत्तम कलाकृती करायची या उद्देशाने निर्मात्याच्या भूमिकेत शिरत आहे’, असे इरफानने जाहीर केले. इरफानची सहनिर्मिती असलेला ‘लंचबॉक्स’ प्रदर्शित व्हायच्या आधीच देश-विदेशातील चित्रपट महोत्सवातून नावाजला गेला आहे. त्याच्या मागच्याच आठवडय़ात जॉन अब्राहमची दुसरी चित्रपटनिर्मिती असलेला ‘मद्रास कॅफे’ हा चित्रपटही समीक्षकांकडून नावाजला जातो आहे. त्याचा पहिला चित्रपट ‘विकी डोनर’ वाखाणलाही गेला आणि तिकीटबारीवर चांगली कमाईही झाली. पण बॉलीवूडमध्ये सर्वोच्च स्थानावर असलेल्या ‘खान’दानापेक्षा तुलनेने फार मागे असलेली जॉन अब्राहम, इरफान खान, लारा दत्ता अशी सगळीच कलाकार मंडळी ज्या सहजतेने चित्रपटनिर्मितीत उतरली आहे ती चक्रावून टाकणारी आहे. पण ही सहजता त्यांच्याकडे आली ती सहचित्रपटनिर्मितीतून. बॉलीवूडची कलाकार मंडळी आणि चित्रपटनिर्मिती करणारे स्टुडिओ यांनी हातमिळवणी करत आघाडीची नवी चित्रपटनिर्मिती सुरू केली आहे, ज्याचा फायदा कलाकार आणि स्टुडिओ दोघांनाही होत असल्याने चित्रपटनिर्मितीसाठी ‘आघाडी’ हे बॉलीवूडचे नवे समीकरण बनले आहे.
गेल्या शंभर वर्षांत एक इंडस्ट्री म्हणून बॉलीवूडमध्ये कितीतरी बदल झाले आहेत. एके काळी ‘प्रभात’सारखे मोठमोठे स्टुडिओ, त्यांच्याकडे महिन्याच्या मानधनावर काम करणारी कलाकार मंडळी होती. मग नंतर आलेली प्रत्येक निर्माता-दिग्दर्शकाची स्वतंत्र कंपूशाही. त्यांची ठरलेली कलाकार मंडळी. ज्यांच्या नावावर आणि चेहऱ्यावर चित्रपट चालतात त्यांना घेऊन चित्रपटनिर्मिती करायची. प्रत्येक चित्रपटागणिक तो कलाकार मोठा होतो, त्याचे मानधन वाढते आणि चित्रपटाचे बजेटही. तिथे मग यश चोप्रांचा बॅनर वेगळा असतो, बी. आर. चोप्रांचा बॅनर वेगळा असतो, शोमन सुभाष घईंची स्वत:ची अशी वेगळी पद्धत असते. डेव्हिड धवनकडे नेहमीच गोविंदा आणि संजय दत्त असतात. चित्रपटनिर्मितीची ही गणितं बरीचशी आणि बराच काळ कलाकारांच्या वलयाभोवती, त्यांच्या लोकप्रियतेभोवती अडकली होती. शंभरावे वर्ष पार करताकरता ही गणितं पार बदलली आहेत. २००० साली आमिर खान, शाहरुख खान हे दोन नावाजलेले कलाकार चित्रपटनिर्मितीकडे वळले तेव्हाही तो बदल सहज पचवला गेला. कारण गुरुदत्त, राज कपूर, देव आनंद या कलाकारांनीही आपापल्या स्वतंत्र बॅनरखाली चित्रपटांची निर्मिती-दिग्दर्शन केले होते; पण दरम्यानच्या काळात अमिताभ बच्चन यांच्या एबीसीएल कॉर्पोरेशनला ‘तेरे मेरे सपने’, ‘मृत्युदाता’सारख्या मोठमोठय़ा चित्रपटांना चांगलाच फटका बसला. अजय देवगणलाही आपल्या वडिलांच्या बॅनरखाली केलेला ‘राजूचाचा’सारखा चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. चित्रपटनिर्मितीचा व्यवसाय हा फायद्याचा आहेच, पण तो तोटय़ात जातो तेव्हा सगळ्यात जास्त नुकसान निर्मात्याचे होते हे लक्षात आल्यानंतर थोडासा हॉलीवूडचा पाठपुरावा करत इथल्या कलाकारांनी आपल्या चित्रपटनिर्मितीचे स्वरूपच बदलून टाकले. अर्थात त्याला हॉलीवूडमधून भारतात पाय रोवून उभे राहिलेल्या डिस्ने यूटीव्ही, फॉक्ससारख्या मोठमोठय़ा चित्रपटनिर्मिती संस्थाही कारणीभूत ठरल्या आहेत.
कलाकाराची निर्मितीसंस्था आणि स्टुडिओची वितरण-विपणन व्यवस्था एकत्र आणून चित्रपटनिर्मिती करायची आणि मग चित्रपटाची जी कमाई होते ती समसमान किंवा आधी ठरलेल्या पद्धतींनुसार वाटून घ्यायची. यात कलाकार कितीही मोठा असला तरी त्याला मानधन द्यावे लागत नाही. निर्मितीसंस्था त्याची असल्याने तो आपल्याला हव्या त्या दर्जानुसार आणि नियोजनानुसार आपला चित्रपट बनवू शकतो. बऱ्याचदा आमिर खान आणि शाहरुख खानसारखे कलाकार मार्केटिंग-प्रसिद्धीच्या योजनांमध्येही लक्ष घालतात. त्यामुळे स्टुडिओला केवळ वितरणावर लक्ष केंद्रित करायचे असते. मुळात सध्या चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच उपग्रह वाहिनी हक्क, पेड प्रिव्ह्य़ूज, संगीताचे हक्क, परदेशातील चित्रपट वितरण, सिनेमाच्या प्रसिद्धीसाठी बनवण्यात आलेली उत्पादने, सिनेमांतर्गत जाहिराती अशा विविध मार्गाने चित्रपटनिर्मितीचा खर्च आधीच वसूल होतो. त्यामुळे चित्रपटनिर्मितीतला जो आर्थिक धोका आहे तो फारच कमी असतो, अशी माहिती ट्रेड विश्लेषकांनी दिली. म्हणूनच शाहरुख खानच्या ‘चेन्नई एक्सप्रेस’ची निर्मिती रेड चिलीज एंटरटेन्मेंट आणि यूटीव्ही डिस्ने यांनी केली आहे; तर इरॉस एन्टरटेन्मेंटने जॉनच्या ‘जेए एन्टरटेन्मेंट’बरोबर ‘विकी डोनर’ आणि सैफ अली खानच्या ‘इल्युमिनेती फिल्म्स’बरोबर ‘एजंट विनोद’, ‘कॉकटेल’ची निर्मिती केली. अजय देवगणनेही यूटीव्हीबरोबर ‘सन ऑफ सरदार’ केला, तर अक्षयनेही ‘व्हायकॉम १८’बरोबर चित्रपटनिर्मिती सुरू केली आहे. अक्षयने तर ‘ग्रेझिंग गोट पिक्चर्स’ आणि ‘हरी ओम एन्टरटेन्मेट’ अशा दोन निर्मितीसंस्थांतर्गत जोरदार चित्रपटनिर्मिती सुरू केली आहे. ‘ग्रेझिंग गोट पिक्चर्स’च्या बॅनरखाली तर अश्विनी यार्दीकडे सगळी टीम सोपवत अक्षयने मराठी, पंजाबी अशा विविध प्रादेशिक चित्रपटनिर्मितीतही उडी घेतली आहे. स्टुडिओंबरोबरची ही आघाडी कलाकारांच्या एवढय़ा पथ्यावर पडली आहे की लारा दत्ता, सुश्मिता सेन, दिया मिर्झासारख्या अभिनेत्रींनीही चित्रपटनिर्मितीत उडी घेतली आहे. त्यामुळे कलाकार अधिक स्टुडिओ म्हणजेच चित्रपटनिर्मिती हे समीकरण बॉलीवूडला निदान पुढची काही वर्षे तरी आर्थिक स्थैर्य मिळवून देणारे ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2013 1:10 am

Web Title: coalition to boost bollywood film industry
टॅग : Bollywood
Next Stories
1 नितीश भारद्वाजच्या दिग्दर्शनातील ‘पितृऋण’
2 रत्नाकर मतकरींचा ‘इन्व्हेस्टमेंट’
3 जळजळीत वास्तवावर प्रकाशझोत