डोंबिवलीतील के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी महाविद्यालयात कशा प्रकारे आचारण करावे याविषयीची एक आचारसंहिता डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षांनी प्रकाशित केली आहे. महाविद्यालयाच्या कारकिर्दीत प्रथमच अशा प्रकारची आचारसंहिता तयार करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये ही आचारसंहिता चर्चेचा विषय झाली आहे.
महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या घटनेत त्यांचे आचरण कसे असावे म्हणून ३९ कलमे आहेत. गैरवर्तन सदरात ५३ कलमांचा समावेश करण्यात आला आहे. या कलमांच्या चौकटीत कर्मचाऱ्यांनी चांगले वर्तन करावे, असे सूचित करण्यात आले आहे. या आचारसंहितेची एक प्रत ‘वृत्तान्त’कडे उपलब्ध आहे.
प्रत्येकाने प्रामाणिक तसेच एकनिष्ठपणे काम करावे. स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार करावा. विद्यार्थी, विद्यार्थिनीला मारहाण करू नये. इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातून कोणतीही अयोग्य माहिती देऊ नये. महाविद्यालयात आर्थिक व्यवसाय किंवा उद्योग करू नयेत. कर्मचारी, विद्यार्थ्यांवर हल्ला होत असल्यास हल्लेखोराला रोखण्यास पुढाकार घ्यावा. शैक्षणिक दौऱ्यावर विद्यार्थ्यांवर बारकाईने लक्ष ठेवावे. पालकांच्या संमतीशिवाय महाविद्यालयातील मुलाला किंवा मुलीला कोणीही विवाहासाठी जबरदस्ती करू नये. कामावर असताना दारू पिऊ नये. कोणत्याही विद्यार्थ्यांला दारू किंवा सिगारेट आणण्यास पाठवू नये. कोणत्याही कर्मचाऱ्याला व्याजाने रक्कम देऊ नये. सावकारांमध्ये मध्यस्थ राहू नये. व्यवस्थापनाच्या परवानगीशिवाय कोणत्याही वृत्तपत्र किंवा मासिकाचा संपादक होऊ नये. वृत्तपत्राला अनधिकृत मुलाखत देऊ नये किंवा कोणतीही बातमी प्रसिद्ध करण्यास सांगू नये. कोणत्याही प्रकारची निनावी पत्रे लिहू नयेत. संस्थेची माहिती कोणत्याही खासगी संस्था, कंपनी व व्यक्तीला दाखवू नयेत. महाविद्यालयाच्या आवारात असताना कोणतेही ध्वनिमुद्रण किंवा छायाचित्रणाचे यंत्र जवळ बाळगू नये, अशा प्रमुख कलमांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.
गैरवर्तनातील कलमे
विद्यार्थी, कर्मचारी यांच्यामध्ये भेदभाव करून त्यांचा बळी देणे. महाविद्यालय, विद्यापीठाविरुद्ध चिथावणी देणे, धार्मिक, पंथीय दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना अशा कामात ओढणे, कोणत्याही प्रकाशन संस्थेचे काम करणे, कोणत्याही प्रकारची वर्गणी वसुली करणे, महाविद्यालयाच्या माध्यमातून कोणाही विद्यार्थ्यांकडून भेटवस्तू स्वीकारणे, महाविद्यालय परिसरात गुंडगिरीने वागणे, परवानगीशिवाय महाविद्यालयात कोणतीही सभा घेऊ नये, अतिरिक्त कामासाठी न येणे, कार्यालयीन गोपनीय माहिती उघड करणे, महाविद्यालय भागात शस्त्रास्त्रे व स्फोटके बाळगणे, लैंगिक विषयावर चर्चा करणे, त्यावर विनोद सांगणे, अश्लील चित्रफिती उपलब्ध करून देणे, व्यवस्थापनाचा दर्जा कमी लेखणारे शेरे वर्तमानपत्रात प्रसिद्ध करणे अशा प्रकारच्या ५३ मुद्दय़ांतून व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांना स्वयंशिस्तीचे धडे देण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत पेंढरकर महाविद्यालयाच्या प्राचार्याशी संपर्क साधला.  त्या वेळी प्राचार्याने ‘आम्ही अशी कोणतीही माहिती देत नाही’ असे सांगितल्याचे स्वीय साहाय्यिकेने ‘वृत्तान्तला’ला सांगितले.