राजीव गांधी जीवनदायी योजनेचा शुभारंभ करण्यासाठी २१ नोव्हेंबरला अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपराजधानीत येणार आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी होणारा कार्यक्रम दर्जेदार व्हावा या दृष्टीने प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी विदर्भातील खासदार, आमदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना दिल्या. यावेळी प्रमुख पदाधिकारी, आमदार व खासदारांकडे जबाबदारी देण्यात आली असून त्यांच्याकडून संबंधित कामाचा अहवाल मागविण्यात आला. या बैठकीच्या निमित्ताने बुथ पातळीवर कार्यकर्त्यांना जोडण्याचे आवाहन करण्यात आले.
एरवी काँग्रेसच्या कुठल्याही कार्यक्रमात गटबाजीचे प्रदर्शन होत असताना या कार्यक्रमासाठी विदर्भातील आमदार, खासदार आणि प्रमुख पदाधिकारी एकत्र आले आहेत. या दौऱ्यादरम्यान कुठलीही गटबाजी होऊ नये यासाठी प्रदेश काँग्रेसतर्फे प्रयत्न केले जात असून सगळ्यांना विश्वासात घेऊन जबाबदारी देण्यात येत आहे. उपराजधानीत सोनिया गांधी यांच्या उपस्थित होणारा हा कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी गावागावात जाऊन प्रचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
 या कार्यक्रमाच्या निमित्ताने पक्षाचे संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहे. ब्लॉक कमिटीच्याबाबतीत  १६ नोव्हेंबपर्यंत निर्णय घेऊन संमेलन आयोजित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आजच्या बैठकीला रोजगार हमी योजना मंत्री नितीन राऊत, सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे, खासदार विलास मुत्तेमवार,  दत्ता मेघे, मारोतराव कोवासे, माजी खासदार गेव्ह आवारी, बाळकृष्ण वासनिक, आमदार दीनानाथ पडोळे, विजय वडेट्टीवार, वीरेंद्र जगताप,  माजी आमदार अशोक धवड, अविनाश वारजुरकर, एस.क्यू जमा, शहर अध्यक्ष जयप्रकाश गुप्ता, जिल्हा अध्यक्ष सुनीता गावंडे आदी विदर्भातील प्रमुख नेते उपस्थित होते.
मुत्तेमवार आणि वडेट्टीवार यांची यावेळी भाषणे झाली. यूपीए सरकारने जाहीर केलेल्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी जनजागृती करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सदस्य मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री शिवाजीराव मोघे बैठकीला अनुपस्थित होते. अनेक नेत्यांनी बैठकीला बोलविले जात नसल्याची तक्रार असल्यामुळे आजच्या बैठकीला सर्व प्रमुख नेत्यांसह खासदार आणि आमदारांना आमंत्रित करण्यात आले होते.