महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात प्रथमच कळवण तालुक्यातील पांढरीपाडा येथे कोल्डमिक्स पध्दतीने रस्ता डांबरीकरण करण्यात आले. या तंत्राआधारे आसामसह सात राज्यांमध्ये रस्ता दुरूस्ती करण्यात आलेली आहे.
कळवणचे अभियंता रमेश क्षीरसागर आणि आसाममधील बिटकेम यांच्या वतीने पांढरीपाडा येथे कोल्डमिक्स तंत्रविषयक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या तंत्राव्दारे एक किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले.
कार्यशाळेस राष्ट्रीय ग्रामीण रस्ता विकास विभागाचे संचालक पी. एल. कडू, मुख्य शास्त्रज्ञ पी. के. जैन, बीटकेमचे राजीव अग्रवाल आदिंनी मार्गदर्शन केले. बीटकेम कंपनीने वनस्पती आणि प्रक्रियायुक्त खनिज पदार्थ यांच्या मिश्रणातून हे तंत्र निर्माण केले आहे. या तंत्राने डांबरीकरण केल्यास रस्त्यांचे आयुष्य वाढते. आसाम, सिक्कीम, त्रिपुरा, मेघालय, मणिपूर, मिझोरम, नागालँड आदी पूर्वोत्तर राज्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात पाऊस पडतो. या राज्यांमध्ये कोल्डमिक्स प्रणाली वरदान ठरली असल्याची माहिती हेमंत दत्ता यांनी दिली. या तंत्रामुळे महाराष्ट्रात बारमाही डांबरीकरणाचे काम करता येऊ शकेल असा विश्वास रस्ते विभागाचे राज्याचे मुख्य सचिव एस. एस. संधु यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रातील ग्रामीण, दुर्गम भागात अतिवृष्टी होणाऱ्या ठिकाणी या तंत्राचा अवलंब केल्यास पर्यावरण संतुलन राखण्यात मदत होईल. शिवाय डिझेलची बचत होऊन लाकूडतोड होणार नाही. पावसाळ्यातही रस्त्याची कामे करता येणार आहेत.