जागतिक स्तरावर प्राथमिक ऊर्जेपासून निर्माण होणाऱ्या २९ टक्के गरजा, जगात निर्माण होणाऱ्या विजेपैकी ४१ टक्के वीज आणि लोखंड उद्योगातील ७० टक्के गरजा पूर्ण करण्यास कोळसा महत्त्वपूर्ण योगदान देते. जगाच्या तुलनेत भारतात सरासरी एक तृतीयांश आणि प्रति व्यक्ति ऊर्जेचे प्रमाण कमी असले तरी भारत हा जगात विजेचा चौथा मोठा ग्राहक आहे. भारतामध्ये ५३ टक्के कोळसा उपलब्ध असून हे प्रमाण जगाच्या तुलनेत दुप्पट आहे. भारताच्या विकासासाठी कोळसा महत्त्वपूर्ण खनिज असल्याचे मत वेकोलिचे अध्यक्ष दिनेशचंद्र गर्ग यांनी व्यक्त केले.
भारतीय वाणिज्य सदनतर्फे दिल्ली येथे सातवे भारत ऊर्जा शिखर संमेलनात ते बोलत होते. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी  ऊर्जा समितीचे अध्यक्ष अनिल राजदान होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून कोळसा मंत्रालयाचे सचिव एस.के. श्रीवास्तव उपस्थित होते. राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या बाबतीत गर्ग म्हणाले, २०१२-१३ मध्ये भारतात सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा विकास दर ५ टक्के आहे. बाराव्या पंचवार्षिक योजनेत हा विकास दर ८ टक्क्यावर जाईल, अशी आशा आहे. त्याचा परिणाम वीज उत्पादनात वाढ होईल, असेही गर्ग म्हणाले. कोळशाच्या वाहतुकीसाठी रेल्वेचे जाळे अधीक मजबूत करण्यासाठी वेकोलिने रेल्वेशी संपर्क वाढवण्याला प्राधान्य दिले आहे. याशिवाय अन्य नवीन योजनांची माहितीही गर्ग यांनी यावेळी दिली.