‘तृतीय वर्ष वाणिज्य शाखे’च्या (टीवायबीकॉम) अंतर्गत मूल्यांकनाचे गुण मुंबई विद्यापीठाकडे सुपूर्द न करण्याच्या संपकरी प्राध्यापकांच्या पवित्र्यावर मात करण्यासाठी विद्यापीठाने आता निराळाच डाव आखला आहे. प्राध्यापकांच्या ताब्यात असलेले हे गुण आमच्याकडे सुपूर्द करा, असा धोशा विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने आता प्राचार्याच्या मागे लावण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी प्राचार्याना नोटिसाही काढण्याच्या तयारीत परीक्षा विभाग आहे. प्राध्यापकांवर कारवाई करण्याचे अधिकार ते ज्या महाविद्यालयांत काम करतात त्या संस्थांनाच फक्त आहेत. त्यामुळेच प्राचार्याची ढाल पुढे करून त्यांना या संपकरी प्राध्यापकांवर कारवाई करणे भाग पाडण्याची परीक्षा विभागाची ही योजना आहे.
टीवायबीकॉमच्या ४० टक्के गुणांचे अंतर्गत मूल्यांकन त्या त्या विषयाच्या प्राध्यापकांनी महाविद्यालयीन स्तरावर केले आहे. हा तपशील सध्या संबंधित प्राध्यापकांकडेच फक्त आहे. प्राध्यापकांनी हे गुण विद्यापीठाकडे सुपूर्दच केले नाही तर विद्यापीठाला उत्तरपत्रिका मूल्यांकनाचे काम पूर्ण करूनही टीवायबीकॉमचा निकाल जाहीर करता येणे शक्य नाही.
१० एप्रिल ही अंतर्गत मूल्यांकनाचे गुण परीक्षा विभागाकडे सुपूर्द करण्यासाठी महाविद्यालयांना दिलेली शेवटची तारीख आहे. पण, आतापर्यंत २९० पैकी केवळ ६५ महाविद्यालयांनी हे गुण विद्यापीठाकडे सुपूर्द केले आहेत. उर्वरित २२५ महाविद्यालयांमध्ये झालेल्या अंतर्गत परीक्षांचे गुण विद्यापीठाकडे येणे बाकी आहे. उत्तरपत्रिका तपासणीचे काम वेळेत पूर्ण झाले तरी हे गुण मिळाल्याशिवाय विद्यापीठाला टीवायबीकॉमचा निकाल जाहीर करणे शक्य नाही. १० एप्रिलपर्यंत अंतर्गत मूल्यांकनाचे गुण आमच्याकडे न आल्यास संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्याना नोटिसा पाठविण्यात येतील, असे परीक्षा नियंत्रक दीपक वसावे यांनी सांगितले. विद्यापीठाने एका बाजूने प्राचार्यावर दबाव आणणे सुरू केले असताना तिकडे प्राध्यापकही अडवणुकीचे धोरण सोडण्यास तयार नाही. अशा प्राध्यापकांवर कारवाईचे अधिकार संस्थेला आहेत. आतापर्यंत महाविद्यालये आपल्या प्राध्यापकांवर कारवाई करणे टाळत आले आहेत. पण, आता आपल्यावरच संकट ओढवले असताना आतातरी प्राचार्य प्राध्यापकांवर कारवाई करणार का असा प्रश्न आहे.
प्राध्यापकांनी अडवणूक करणे बरोबर नाही
प्राध्यापकांच्या ताब्यात असलेले गुण आम्ही कसे देणार? त्यामुळे अंतर्गत मूल्यांकनाचे गुण अडवून विद्यार्थ्यांची आणि प्राचार्याची अडवणूक करणे बरोबर नाही.
टी. ए. शिवारे,
हिंदुजा महाविद्यालयाचे प्राचार्य