पुष्पगुच्छ व हारांऐवजी शुभेच्छा रूपाने रद्दी द्यावी या आमदार चंद्रकांत पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद मिळून ५ टन रद्दी व रोख ४० हजार रुपये जमले. त्यात तितकाच निधी घालून वर्षभर हा उपक्रम चालवून पाटील हे ‘सावली केअर सेंटर’ च्या ३ कोटींच्या नियोजित वास्तूसाठी वीट पुरविण्याची जबाबदारी घेणार आहेत.    
आमदार पाटील यांना सकाळपासून प्रत्यक्ष भेटून तसेच फोनवरून शुभेच्छा देण्यात आल्या. यामध्ये भाजपाचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते विनोद तावडे, भाजपाचे लोकसभेतील उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. तसेच आमदार सुरेश हाळवणकर, आमदार चंद्रदीप नरके,आमदार सुजित मिणचेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, जिल्हाप्रमुख विजय देवणे, धनंजय महाडिक, अमल महाडिक यांच्यासह आंतरराष्ट्रीय नेमबाज तेजस्विनी सावंत आदींनी शुभेच्छा दिल्या. या वेळी वृक्षरोपण, रक्तदान शिबिरासह अनेक सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
दरम्यान येत्या गणेशोत्सवात कागदी लगद्यापासून तयार केलेल्या गणेशमूर्ती निम्या किमतीत उपलब्ध करून देण्याचा मनोदय पाटील यांनी जाहीर केला. त्या विषयी व्यक्ती व संस्था यांनी नोंदणी करावी या आशयाचा फलक वाढदिवसस्थळी लावण्यात आला होता.     
वर्षभर सावली केअर सेंटरच्या मदतीसाठी रद्दी भाजपाच्या कार्यालयात स्वीकारली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या वेळी जिल्हाध्यक्ष महेश जाधव, किशोर घाटगे, अशोक देसाई, अ‍ॅड.संपतराव पवार, नगरसेवक आर.डी.पाटील, सुभाष रामुगडे, प्रभा टिपुगडे, राहुल चिकोडे, संदीप देसाई, तेजस्विनी हराळे-भोसले आदी उपस्थित होते.