एकशेवीस देशांची नाणी, शंभर देशांच्या नोटा, तेवढय़ाच देशांमधील टपाल तिकिटे. शंख, शिंपले, वेगवेगळ्या प्रकारचे अश्म, पितळी भांडी. वेगवेगळ्या प्रकारचे आकर्षक पेन.. असा वैविध्यपूर्ण वस्तूंचा आगळावेगळा संग्रह सतीश खिंवसरा यांनी जोपासला आहे. या छंदात सन १८७०चे घडय़ाळ आहे.
खिंवसरा यांच्या संग्रहात एवढय़ा नाना प्रकारच्या वस्तू आहेत की, विचारता सोय नाही. मराठेशाहीतील पत्त्याचा डावही त्यांच्याकडे आहे. कळंब शहरात त्यांना सर्वजण बंडू या नावाने ओळखतात. कळंब शहरात प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय करणाऱ्या खिंवसरा यांना वेगवेगळ्या वस्तू गोळा करण्याचा छंद लहानपणापासून आहे. गेल्या २४ वर्षांपासून ते विविध वेगळ्या वस्तू गोळा करीत आहेत. १२० देशांची नाणी, नोटा, वेगवेगळ्या प्रकारचे दगड, जुनी पुरातन भांडी आणि नाना प्रकारचे पेन हे तर आहेच; शिवाय काडीपेटीच्या कव्हरचाही मोठा संग्रह त्यांच्याकडे आहे. एखाद्याला नवीन गोष्ट दिसली की ती तो खिंवसरांकडे लगोलग आणून देतो. केवळ वस्तूच नाही, तर हळूहळू त्यांचे वाचनही वाढत गेले. त्यांच्याकडे आता २ हजार पुस्तके आहेत. वडील मोहनलाल खिंवसरा यांच्या नावाने त्यांनी वाचनालयही सुरू केले आहे. त्यांनी नेपाळमधून एक घंटी मिळविली. ही घंटी फिरवली की ‘ओम’ असे स्वर बाहेर येतात. त्यांच्या संग्रहात चष्म्याच्या आकाराचा पेन आहे. वेगवेगळ्या वस्तू गोळा करणाऱ्या खिंवसरांचा संग्रह उस्मानाबाद जिल्ह्य़ात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.