भूमिहीन कुटुंबातील कर्त्यां व्यक्तीस विम्याचे संरक्षण देण्यासाठी राज्यात सुरू केलेल्या आम आदमी योजनेत आता इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत. अतिरिक्त जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी याबाबत कृती आराखडा तयार केला असून १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर दरम्यान सर्व माहिती संकलित केली जाणार आहे.
केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्याने राज्यात आम आदमी योजना लागू झाली. राज्यात अनेक जिल्ह्यांच्या तुलनेत नांदेडमध्ये योजनेचे काम चांगले सुरू आहे. योजनेसाठी सरकारने दोन कोटी निधीही मंजूर केला. राज्याच्या सामाजिक न्याय विशेष साह्य विभागाच्या वतीने भूमिहीन शेतकऱ्यांसाठी चालू केलेल्या या योजनेंतर्गत आता विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे.
त्रमासिक शिष्यवृत्ती सुरू करण्यासाठी विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. वेगवेगळी कागदपत्रे जमा करावी लागतात. त्यामुळे विहित मुदतीत शिष्यवृत्ती मिळत नाही. विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन अतिरिक्त जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पुढाकार घेऊन कृतिआराखडा तयार केला. १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर दरम्यान पात्र विद्यार्थ्यांच्या याद्या तयार करण्यात येणार आहेत. त्यांची कागदपत्रे तलाठय़ांकडून मिळविण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना घरबसल्या शिष्यवृत्ती मिळावी, हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश असून त्यादृष्टीने सर्व संबंधितांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. पाच एकरपेक्षा कमी जिरायती व अडीच एकरपेक्षा कमी बागायत शेतजमीन धारण करीत असलेल्या व्यक्तीला भूमिहीन म्हणून गृहीत धरण्यात येते. अशाच पात्र लाभार्थ्यांच्या पाल्यांसाठी आता घरबसल्या शिष्यवृत्ती मिळणार आहे. या उपक्रमाची किती प्रभावी अंमलबजावणी होते, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.