लष्कराबद्दल प्रत्येकाला आदर व आकर्षणही. युवावर्गापैकी काहींची लष्करी सेवेत दाखल होण्याची इच्छा असली तरी योग्य मार्गदर्शनाचा अभाव हा त्यातील महत्त्वपूर्ण अडथळा ठरतो. त्यामुळे इच्छा पूर्ण न झालेले अनेक जण दिसतील. या पाश्र्वभूमीवर मराठी विज्ञान परिषदेच्या नाशिक शाखेने विशेष कार्यक्रमाव्दारे ‘लष्करातील विविध संधी’चा पट तज्ज्ञांकडून उलगडण्याचे निश्चित करताच त्यास युवावर्गाने लक्षणीय गर्दी केली. लष्करी सेवेत जाण्याची मनीषा बाळगणाऱ्यांसाठी हा राजमार्ग ठरला.
विज्ञानाचा मराठी भाषेतून प्रसार करण्याच्या उद्देशाने कार्यरत मराठी विज्ञान परिषदेच्या वतीने रविवारी आयोजित या कार्यक्रमात एअर व्हॉइस मार्शल (निवृत्त) आर. डी. लिमये आणि पुण्याच्या अॅपेक्स करिअरचे संचालक लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) प्रदीप ब्राह्मणकर यांनी भारतीय हवाई दल, नौदल व लष्करातील वेगवेगळ्या संधींविषयी मार्गदर्शन केले. मुंबई व पुणे या शहरात लष्करी सेवेतील करिअरबद्दल माहिती देणाऱ्या अनेक खासगी व शासकीय संस्था कार्यरत आहेत. नाशिकमध्येही एखाद्या खासगी संस्थेचा अपवाद वगळता अशी माहिती तरुणांना मिळत नाही. लढाऊ विमानांची बांधणी करणारा हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, तोफखान्याचे प्रशिक्षण केंद्र व भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांना वैमानिक बनविण्याचे प्रशिक्षण देणारे आर्मी एव्हीएशन स्कूल यां सारख्या संस्थांमुळे लष्कराचे महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून नावारूपास आलेल्या नाशिकची ही स्थिती आहे. या लष्करी संस्थांकडून करिअरच्या संधीबाबत थोडे थोडके नव्हे तर दोन ते तीन वर्षांच्या कालखंडानंतर अधूनमधून प्रदर्शनांच्या माध्यमातून जनजागृती केली जाते. हे प्रयत्न अतिशय त्रोटक स्वरूपात असल्याने आणि शहर वा जिल्ह्यातील इतर स्वयंसेवी संस्थांकडून या अनुषंगाने मार्गदर्शनपर कार्यक्रम करण्यात फारसा रस दाखविला जात नसल्याने स्थानिक युवावर्गाची झालेली कोंडी यानिमित्ताने काही अंशी दूर होऊ शकली.
इयत्ता बारावी ते पदवी शिक्षणापर्यंत विद्यार्थ्यांना लष्करी सेवेत कशी संधी आहे, याची माहिती ब्राम्हणकर यांनी दिली. भारतीय सैन्यदल, हवाई दल व नौदलासाठी पुरुष आणि सैन्य दलातील महिला अधिकारी निवडीसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत कंबाइन्ड डिफेन्स सव्र्हिसेस ट्रेनिंग एग्झामिनेशन (सी. डी. एस.) परीक्षा घेतली जाते. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना भारतीय लष्कर प्रबोधिनी (डेहराडून), भारतीय नौदल प्रबोधिनी (एझिमाला), हवाई दल प्रबोधिनी (हैदराबाद) आणि अधिकारी प्रशिक्षण प्रबोधिनी (चेन्नई) या ठिकाणी प्रशिक्षणासाठी निवड होते. या परीक्षांची पात्रता, अर्हता, त्याकरिता अर्ज करावयाची पद्धती, लेखी व तोंडी परीक्षेचे स्वरूप आदी मुद्दय़ांवर ब्राम्हणकर यांनी माहिती दिली. लष्करी सेवेचे लाभ, साहसी क्रीडा प्रकारांसाठी मिळणारे प्राधान्य या सर्वाचा तरुणांनी विचार करायला हवा, असे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थ्यांनी एस. एस. बी. (शॉर्ट सव्र्हिस कमिशन) च्या मुलाखतीचे स्वरूप, लेखी परीक्षा आदी प्रश्न उपस्थित करून आपले समाधान करवून घेतले.
या व्याख्यानानंतर लिमये यांनी ‘लढाऊ विमाने’ या विषयावर मार्गदर्शन करताना लष्करी कार्यवाहीतील हवाई दलाचे महत्त्व कारगिल युद्धातील चित्रफितीच्या माध्यमातून पुढे आणले. कोणत्याही युद्धात शत्रूवर तुटून पडण्यासाठी हवाई दल महत्त्वपूर्ण भूमिका निभावत असतो. त्याकरिता कारगिल युद्धाबरोबर अमेरिकेने इराक व सध्या अफगाणिस्तानमधील युद्धात हवाई दलाच्या केलेल्या कौशल्यपूर्वक वापराचे संदर्भ त्यांनी दिले. लढाऊ विमानांच्या विकासात काही वर्षांत झालेले लक्षणीय बदल, जगातील आघाडीच्या देशांकडून वापरली जाणारी लढाऊ विमाने, सहाव्या पिढीची येऊ घातलेली लढाऊ विमाने अशा अनेक मुद्यांकडे त्यांनी लक्ष वेधले.
लढाऊ विमानांकडून वापरली जाणारी शस्त्रास्त्रे, त्यांचे स्वरूप, अचूक मारा करण्यासाठी वापरले जाणारे लेझर गाइडेड बॉम्बचे तंत्रज्ञान आदींविषयी विस्तृत माहिती देताना या क्षेत्रातील अभियांत्रिकी संधींची जाणीव करून दिली. देशाने आपल्याला काय दिले याचा आपण नेहमी विचार करतो.
परंतु, देशासाठी आपण काय केले, याचा विचार होत नसल्याची त्यांनी व्यक्त केलेली खंत जमलेल्या तरुण-तरुणींमध्ये प्रेरणा जागविणारी ठरली.