स्थापनेच्या शतकपूर्तीकडे वाटचाल करणारे वैभवशाली गंगाधर शास्त्री गुणे आयुर्वेद महाविद्यालय आता मात्र कायमचे बंद पडण्याची भीती महाविद्यालयातील सहयोगी अध्यापक तथा विभागप्रमुख डॉ. श्रीधर दरेकर यांनीच व्यक्त केली आहे. महाविद्यालयातील प्रवेश गेले तीन वर्षे बंद असून याही वर्षी ते होणार नाहीत अशीच स्थिती असल्याचे सांगून त्यांनी व्यवस्थापनावर गंभीर आरोप केले आहेत.
डॉ. दरेकर यांनी गुरुवारी पत्रकारांना याबाबतची माहिती दिली. महाविद्यालयाचा परिसर हा राष्ट्रवादी काँग्रेसचा अड्डा झाल्याचा गंभीर आरोप दरेकर यांनी केला. ते म्हणाले, महाविद्यालयाच्या रुग्णालयाचे रूपांतर अनाथालय व धर्मशाळेतच झाले असून, मुलांचे वसतिगृह हे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे विश्रांतीचे ठिकाण बनले आहे. निवासी वैद्यकीय अधिकाऱ्याच्या निवासस्थानाची मोडतोड करून येथेच राष्ट्रवादीचे कार्यालय थाटण्यात आले आहे. या राजकीय कार्यकर्त्यांचा विद्यार्थी व विद्यार्थिनींनाही मोठा त्रास असून, त्याच्या विरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला असता तो दडपण्यात आला. महाविद्यालयातील राजकीय पक्षाचे हे कार्यालय येथून तातडीने हलवावे अशी मागणी दरेकर यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
दरेकर म्हणाले, सुमारे शंभर वर्षांची उज्ज्वल परंपरा असलेले गुणे आयुर्वेद महाविद्यालय हे कधीकाळी राज्यातच नव्हेतर देशातील अग्रगण्य संस्था होती. (स्व) वैद्य पं. गं. शास्त्री गुणे यांनी सन १९१७ मध्ये पत्नीच्या अंगावरील दागिने विकून हे महाविद्यालय सुरू केले, मात्र स्थापनेचा शतक महोत्सव साजरा करण्यापूर्वीच हे महाविद्यालय बंद पडण्याची भीती आहे. संस्थाचालक व प्राचार्याचा मनमानी कारभार, बेकायदेशीर कृत्ये व दडपशाहीमुळे कर्मचाऱ्यांमध्येही प्रचंड असंतोष निर्माण झाले आहे. सन २०१० मध्ये विद्यार्थी व पालकांना फसवून महाविद्यालयात बेकायदेशीरपणे प्रवेश देण्यात आले. मात्र सगळय़ाच गोष्टी नियमबाहय़ असल्यामुळे या ५० विद्यार्थ्यांची दोन वर्षे तर वाया गेली. त्या वेळी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढूनही कोणताच फायदा झाला नाही. या विद्यार्थ्यांची मोठीच हानी झाली असून त्यांनी प्रत्येकी २५ लाख रुपये नुकसानभरपाईची मागणी केली आहे. मात्र दमदाटी करून त्यांची अनामत रक्कमही संस्थाचालकांनी अडवून ठेवली आहे.
सीसीआयएमच्या समितीने नुकतीच महाविद्यालय व रुग्णालयाची पाहणी केली. गेल्या वेळच्या समितीने संस्थेचे बारकाईने निरीक्षण केले होते. आता येऊन गेलेल्या समितीचे निरीक्षण, हे एक कोडेच आहे. अनुभवी प्राध्यापकांना डावलून संस्थाचालकांनी वैद्य संगीता निंबाळकर यांची महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी नियुक्ती केली आहे. या प्राचार्यानी स्वत:च्या पतीलाच एकाच वेळी तब्बल सात वेतनवाढी देऊन भ्रष्टाचाराचा कळस केला असा आरोप दरेकर यांनी केला. ते म्हणाले, आयुर्वेद संचालकांनीच या बेकायदेशीर वेतनवाढी रद्द करून पगारातून या रकमेची वसुली केली आहे. अध्यापक व कर्मचाऱ्यांच्या भविष्यनिर्वाह निधीतील थकबाकी भरण्यासाठीही या प्राचार्यानी दमदाटी करून प्रत्येकी १४ हजार रुपयांची खंडणी गोळा केली आहे. पावती न देताच ही रक्कम गोळा करण्यात आली आहे.
गैरकारभार, भ्रष्टाचार, मनमानी यामुळे उज्ज्वल परंपरा असणारे हे महाविद्यालय बंद पडण्याची भीती निर्माण झाली असून, आजी-माजी अध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांची कृति समिती स्थापन करून या कारभाराविरुद्ध आंदोलन उभारण्याचा मनोदय दरेकर यांनी व्यक्त केला.