राजधानी नवी दिल्ली येथे तरुणीवरील सामूहिक बलात्काराच्या घटनेचे देशभर पडसाद उमटले असताना मोदगा (ता.बेळगाव) येथील महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार करून निर्घृणपणे खून करण्यात आला आहे. या प्रकारामुळे तेथील नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. या प्रकरणी माडियाळ पोलिसांनी तीन पथके तपासासाठी पाठविली आहेत. रविवारी पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले.
    श्रीनगर येथील राहय़न्ना महाविद्यालयात ही विद्यार्थिनी बी.ए.च्या दुसऱ्या वर्गात शिकते. शुक्रवारी ती परीक्षेसाठी बेळगावला गेली होती. सायंकाळपर्यंत ती परत न आल्याने तिची नातेवाइकांकडे चौकशी करण्यात आली. शनिवारी सकाळी खणगाव रस्त्यावर कलागती यांच्या शेतात तिचा मृतदेह सापडला. एकुलत्या एक मुलीचा खून झाल्याचे पाहून कुटुंबीयांनी केलेला आक्रोश हृदय हेलावणारा होता. बलात्कार केल्यानंतर आरोपींनी तिच्या मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी तीक्ष्ण हत्याराने डोक्यावर प्रहार केले होते. पायावर दगड टाकल्याने तो सुजला होता. घडय़ाळ, पैंजण व चप्पलमुळे तिची ओळख पटली.
     संतप्त नागरिकांनी बेळगाव-बागलकोट रस्त्यावर रास्ता रोको सुरू केला. साडेतीन तासांहून अधिक काळ आंदोलन सुरू राहिल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. आरोपींना अटक होत नाही तोवर मृतदेह रस्त्यावरून हलवणार नाही, अशी आक्रमक भूमिका नागरिकांनी घेतली होती. रस्त्यावर टायरी पेटवून टाकण्याचा प्रकारही घडला.
    या युवतीचा विवाह २० मे रोजी बेनचिनमर्डी येथील युवकाशी विवाह होणार होता. त्यासाठी वडिलांनी जमीन विकून चार तोळे सोने खरेदी केले होते. घरात लगीनघाई सुरू असतानाच नराधमांनी तिच्यासह तिचा संसारही उद्ध्वस्त केला.
    बेळगावचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासाची सूत्रे स्वत:कडे घेतली. आरोपींना पकडण्यासाठी तीन विशेष पथके रवाना करण्यात आली. यातील दोघा संशयित आरोपींना रविवारी ताब्यात घेण्यात आले होते.