स्वाइन फ्लू आजारासंदर्भात काही जणांकडून समाज माध्यमांव्दारे अफवा पसरविण्यात येत असल्याने जनजागृतीसाठी प्रशासनाचे अधिकारी आता स्वत: व्याख्यानांव्दारे प्रबोधन करू लागले आहेत. विशेषत: शाळा, महाविद्यालयांमध्ये अधिक लक्ष देण्यात येत असून ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना साथीला घेऊन जनजागृतीपर फेऱ्या काढण्यात येत आहेत.
लोकसंकल्प हेल्थ फाऊंडेशन आणि अन्न औषध प्रशासनाच्या वतीने शहरात स्वाइन फ्लू जनजागृती अभियान राबविण्यात आले. इंगळेनगरमध्ये महापालिका शाळा क्र. १११, ११३ साने गुरूजी विद्यालय, वनिता विकास मंडळ संचलीत प्राथमिक माध्यमिक हायस्कुल आणि जेलरोड येथील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या अभिनव शाळेत विद्यार्थ्यांना स्वाइन फ्लू आजाराविषयी डॉ. जयदीप भांबरे आणि औषधांच्या वापरासंदर्भात औषधे निरीक्षक प्रविण हारक यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकसंकल्प हेल्थ फाऊंडेशनचे अध्यक्ष महेंद्र शहा होते.
यावेळी विभागीय अधिकारी किशोर चव्हाण, स्वच्छता निरीक्षक संजय दराडे, केंद्र प्रमुख लता सोनवणे, हेमलता मोहिते आदी उपस्थित होते. डॉ. भांबरे यांनी स्वाइन फ्लूच्या विषाणुंचा प्रसार रोखण्यासाठी शिंकताना किंवा खोकताना रुमाल व टिश्यु पेपरचा वापर करण्याची सूचना केली. मुलांनी हात स्वच्छ पाणी व साबणाने धुवावेत, स्वच्छ हातरुमाल वापरावा, थकवा जाणवू लागल्यास विश्रांती घ्यावी, तोंडावर तिनपदरी कापडी रुमाल अथवा मास्क वापरावा, परस्परांशी हस्तांदोलन, गळाभेट टाळावे, ताण तणाव कमी करून प्राणायमासारखे व्यायाम करून पुरेशी झोप घेवून शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवावी, आजाराचे कोणतेही लक्षण दिसल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेवून औषधोपचार करावा असे त्यांनी सांगितले. औषधे निरीक्षक प्रविण हारक यांनी आजार असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच अधिकृत विक्रेत्यांकडून औषधे घ्यावीत, डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर व पूर्ण घेतल्यास आजार लवकर बरा होईल, औषधाची जाहिरात बघून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेवू नये, औषधे लहान मुलापासून दूर ठेवावीत, क्षयरोग, स्वाइन फ्लू यांची औषधे सरकारी रुग्णालयात मोफत उपलब्ध असून रूग्णांनी त्याचा फायदा घेण्याचे आवाहन त्यांनी केले. सूत्रसंचालन शिवाजी हांडोरे यांनी केले आभार अमित कवडे यांनी मानले.
ग्रामस्थांमध्ये स्वाइन फ्लूविषयी असणारी भीती दूर करण्यासाठी आणि हा आजार कशामुळे होतो, याची लक्षणे कोणती, हा आजार होऊ नये यासाठी कोणती खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे, याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी नांदगाव येथे नगर परिषदेच्या वतीने स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. या मोहिमेंतर्गत शहराच्या मध्यवर्ती भागातून फेरीही काढण्यात आली. नांदगावमधील एच. आर. हायस्कुल आणि कमलाबाई माणिकचंद कासलीवाल विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक तसेच नगराध्यक्ष बाळकाका कलंत्री, नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी निर्मला गायकवाड यांनीही फेरीमध्ये सहभाग घेतला.