आत्महत्याग्रस्त विदर्भातील शेतकऱ्यांना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी व मानसिक पाठबळ देण्यासाठी समाजाने पुढे येण्याची गरज आहे, असे प्रतिपादन वर्धा तालुक्यातील कारंजा-घाडगे येथील ‘आपुलकी’ या संस्थेचे अध्यक्ष व संगणक अभियंता अभिजित फाळके यांनी केले.
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे कुटुंबीय आणि शेतकऱ्यांसाठी करीत असलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी मैत्री परिवार संस्थेतर्फे २१ हजार रुपये रोख, मानपत्र, स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ व श्रीफळ असे स्वरूप असलेला पुरस्कार सायंटिफिक सभागृहात आयोजित सोहळ्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉ. पी.के. देशपांडे यांच्या हस्ते फाळके यांना प्रदान करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी मैत्री परिवार संस्थेचे अध्यक्ष प्रा. प्रमोद पेंडके, सचिव संजय भेडे, संजय नखाते, विजय शहाकार, विवेक सोनटक्के प्रामुख्याने उपस्थित होते. फाळके म्हणाले, विदर्भातील शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या पाहून त्यांना काहीतरी मदत करावी, असा विचार आला. त्याला आई-वडील, पत्नी आणि मित्रांनी होकार दिला. त्यानंतर आपुलकी ही संस्था स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून विदर्भातील २९०आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या घरापर्यंत सौर दिवे उपलब्ध करून दिले.
या सौर दिव्यासांठी विदर्भापेक्षा पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांचीच अधिक मदत मिळाली. गेल्या दोन वर्षांत विदर्भात शेतकऱ्यांसाठी सात कार्यशाळा घेतल्या. त्यात तीन हजार शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले. शेतात पिकवलेला शेतमाल ग्राहकांपर्यंत कसा पोहचावा, याची माहिती शेतकऱ्यांना या कार्यशाळेमध्ये दिली. त्याचा फायदा असा झाला की हे शेतकरी आपला माल सामूहिकरीत्या विदेशात पाठवू लागले आहेत. हे आपुलकीला मिळालेले यश आहे, असे फाळके म्हणाले.
आपुलकीतर्फे एक सर्वेक्षण करण्यात आले. त्यात ३३ हजार शेतकऱ्यांच्या मुलांना एक प्रश्न विचारला गेला. तुम्ही शेती करणार काय, असा हा प्रश्न होता. या प्रश्नाच्या उत्तरात फक्त ३९६ शेतकऱ्यांच्याच मुलांनी शेती करणार असल्याचे सांगितले. उर्वरित मुलांनी शेती करण्यास स्पष्ट नकार दिला. याचाच अर्थ असा की, शेती करण्यास शेतकरी उरणार नाही. याचे कारण शेतकऱ्यांना समाजात असलेली अप्रतिष्ठा हे होय. त्याचा भयंकर परिणाम कृषीप्रधान भारत देशावर पडू शकतो. यासाठी शेतकऱ्यांना प्रतिष्ठा मिळवून देण्याची, त्यांना मानसिक धीर देण्याची गरज आहे. यासाठी समाजानेच पुढाकार घेतला पाहिजे, असे कळकळीचे आवाहन फाळके यांनी याप्रसंगी केले.
समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना शोधून त्यांचा गौरव करीत असल्याबद्दल डॉ. पी.के. देशपांडे यांनी मैत्री परिवार या संस्थेचे कौतुक केले. तसेच हा पुरस्कार मिळाल्याबद्दल फाळके यांचे अभिनंदन करून पुढेही असेच कार्य सुरू ठेवण्याचा सल्ला दिला. संजय नखाते यांनी प्रास्ताविकातून संस्थेतर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली. प्रा. माधुरी यावलकर यांनी संचालन केले तर प्रा. प्रमोद पेंडके यांनी आभार मानले.