सोलापूर महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी स्वच्छ, पारदर्शक व कार्यक्षम प्रशासनाचा अनुभव देत महापालिकेची मलिन झालेली प्रतिमा उजळविण्याचा प्रयत्न हाती घेतला आहे. त्याचाच एक महत्वाचा टप्पा म्हणून गुडेवार यांच्या प्रशासनाने महापालिकेचे कारभारी असलेले सभागृह नेते महेश कोठे तथा त्यांचे वडील विष्णुपंत कोठे यांच्या विष्णू-लक्ष्मी सहकारी द्राक्ष मद्यार्क उत्पादन संस्थेची मालमत्ता ९५ लाखांच्या थकीत एलबीटी वसुलीसाठी तूर्त जप्त केली आहे. ही कारवाई म्हणजे कोठे यांना धक्का असल्याचे मानले जात आहे.
सोलापूर महापालिकेत काँग्रेसचे स्थानिक नेते विष्णुपंत कोठे यांचे गेल्या २५ वर्षांपासून अबाधित वर्चस्व आहे. त्यांचे पुत्र तथा सभागृह नेते महेश कोठे हेच खऱ्या अर्थाने पालिकेचा गाडा हाकतात. सोलापूरचे खासदार, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे घनिष्ट सहकारी म्हणून विष्णुपंत कोठे यांची ओळख असली तरी अलीकडे ८-९ वर्षांपासून उभयतांमध्ये राजकीय ‘शीतयुध्द’ चालल्याची चर्चा उघडपणे होत आहे. या पाश्र्वभूमीवर सुशीलकुमार िशदे यांनी वैयक्तिक रस दाखवून कोठे यांची कोंडी करण्यासाठीच महापालिकेत चंद्रकांत गुडेवार यांच्यासारखा आयुक्त आणल्याचे बोलले जाते. आयुक्त गुडेवार यांनी मागील साडेतीन महिन्यांच्या अल्पकाळातच स्वतचा ठसा निर्माण करून सामान्य नागरिकांत शाश्वत विकासाबद्दलची विश्वासार्हता वाढविल्याचे दिसून येते.
आयुक्त गुडेवार यांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता स्वतच्या कार्यशैलीतून शहरातील वाढती अतिक्रमणे, अवैध बांधकामे पाडण्याचा धडाका लावला असताना दुसरीकडे महापालिकेतील गरकारभार, मनमानी व बेफिकिरी वृत्तीला आळा घातला आहे. यात नगर अभियंता सुभाष सावस्कर यांच्यासह तब्बल १७ अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित करून गुडेवार यांनी चांगलाच दरारा निर्माण केला आहे. आयुक्त गुडेवार यांनी केंद्रशासनाकडून २०० बसेस मंजूर करून घेत नागरिकांमध्येही विश्वासार्हता वाढविली आहे. तर त्याचवेळी थकीत एलबीटी व मिळकतकर वसुलीसाठीही त्यांनी यशस्वीपणे मोहीम आखली आहे.
थकीत एलबीटी वसुली मोहिमेत आयुक्तांनी आपला मोर्चा बडय़ा धेंडयांकडे वळविला आहे. यात महापालिकेचे कारभारी असलेले विष्णुपंत कोठे व पालिका सभागृह नेते महेश कोठे यांच्या अक्कलकोट रोड एम.आय.डी.सी. तील विष्णू-लक्ष्मी सहकारी द्राक्ष मद्यार्क उत्पादन संस्थेकडे तब्बल ९५ लाख ६८ हजारांची एलबीटी थकबाकी असल्यामुळे या संस्थेची मालमत्ता तूर्त जप्त करून संस्थेला ही मालमत्ता कायमस्वरूपी जप्त का करू नये म्हणून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या कारवाईमुळे कोठे यांना धक्का बसल्याचे मानले जात आहे. दरम्यान, या कारवाईची आपणास माहिती नसल्याचे पालिका सभागृह नेते महेश कोठे यांनी सांगितले.