आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर डॉ. श्रीकर परदेशी यांनी धडाक्याने सुरुवात केली. मात्र, त्यांच्या अमेरिका दौऱ्यावर जाण्याने पालिका एकदम थंडावली. प्रभारी आयुक्तांनी एकेक दिवस काढण्याचे धोरण ठेवल्याने कामे खोळंबली व फाईलींचा ढीग लागला. अधिकारी मंदावले तर कर्मचारी मोकाट सुटल्याचे चित्र दिसू लागले. या दोन महिन्यांच्या कालावधीत स्थायीसह विषय समित्या व पालिका सभेतही अपेक्षित कामकाज झाले नाही. सोमवारी रुजू झाल्यानंतर आयुक्तांना सोमवारी दिवसभरात याचा पुरेपूर प्रत्यय आला. महापौर मोहिनी लांडे, सर्वपक्षीय नगरसेवक व अधिकाऱ्यांनीही तक्रारींचा पाढा आयुक्तांसमोर वाचला.
अमेरिकेत दोन महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी गेलेले डॉ. परदेशी काल रात्री शहरात दाखल झाले व सोमवारी सकाळी अकरा वाजता पालिकेत रुजू झाले. दिवसभरात त्यांनी आढावा घेतला. तेव्हा मागील दोन महिन्यांत आलेला संथपणा त्यांच्या लक्षात आला. त्यातच महापौरांसह नगरसेवकांनी आमची कामे झाली नाहीत, याकडे त्यांचे लक्ष वेधले. काही अधिकाऱ्यांनी आयुक्तांना अशाच पद्धतीची माहिती पुरवली. ठोस निर्णय होत नसल्याने स्थायी समिती, क्रीडा समिती, विधी समितीच्या सदस्यांनी आयुक्त आल्यानंतरच पाहू, असे म्हणत महत्त्वाचे निर्णय घेतले नाहीत. पालिका सभादेखील आयुक्त रुजू झाल्यानंतरच घेऊ, असे महापौरांनी ठरवले.
प्रभारी आयुक्तांच्या संथ कारभाराच्या तक्रारी अजितदादांपर्यंत गेल्या होत्या. त्याचा जाब त्यांनी विचारला होता. यासंदर्भात कामात आलेली मरगळ दूर करू व आधी सुरू असलेली कामे वेगाने सुरू ठेवू, अशी ग्वाही आयुक्तांनी दिली. प्रभारी कामकाज करताना मर्यादा असतात. त्यामुळे काही निर्णय घेतले गेले नसतील, असे सांगत त्यांनी प्रभारी आयुक्तांची बाजू मांडण्याचा प्रयत्नही केला.