महापालिकेच्या आयुक्त पदासाठी स्वतंत्र व्यक्ती नियुक्त करण्यास शासन विसरले की काय, अशी स्थिती सध्या येथे आहे. या पदाचा कार्यभार काही महिन्यांपासून उपजिल्हाधिकारी व सध्या जिल्हाधिकाऱ्यांना सांभाळावा लागत आहे. दोन्ही पदांचा कार्यभार महत्वपूर्ण असल्याने तो हाकताना जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांना मात्र कसरत करावी लागत आहे.
तत्कालीन आयुक्त प्रकाश बोरवड यांची सहा महिन्यापूर्वी बदली झाल्यावर जिल्हधिकारी राजूरकर यांनी उपजिल्हाधिकारी सोमन गुंजाळ यांच्याकडे प्रभारी आयुक्त म्हणून कार्यभार दिला. गुंजाळ यांच्याकडे कार्यभार सोपवून सहा महिन्याचा कालावधी लोटला असला तरी आयुक्तपदी नव्याने नियुक्ती झाली नाही. दरम्यान, प्रभारी आयुक्त गुंजाळ सध्या रजेवर गेल्याने त्यांचा प्रभारी आयुक्तपदाचा कार्यभार जिल्हाधिकाऱ्यांना स्वीकारावा लागला आहे. अशा प्रकारे महापालिकेला सक्षम असा आयुक्तच नसल्याने प्रशासनात पूर्णपणे मरगळ आल्याचे वातावरण आहे. गैरप्रकार व घोटाळ्यांच्या गर्तेत सापडलेल्या महापालिकेचे बरेच नगरसेवक सहा ते दहा महिन्यांपासून तुरुंगात आहेत. सत्ताधारी गटाचे नेतृत्व करणारे आ. सुरेश जैन व मार्गदर्शक प्रदीप रायसोनी हेही तुरुंगात असल्याने सत्ताधारी गट सैरभैर झाला आहे. अशीच परिस्थिती पालिका प्रशासनात पाहावयास मिळत आहे. सक्षम व कायमस्वरूपी आयुक्त नसल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये बेशिस्त वाढीस लागली आहे. शहरात अस्वच्छतेच्या प्रमाणात वाढ झाली असून डेंग्यु व मलेरियाने हातपाय फैलावले आहेत. मूलभूत नागरी सुविधांबाबत नागरिकांची ओरड असताना त्यांना कोणी विचारत नसल्याचे चित्र दिसत आहे. पालिकेच्या वाघूर पाणी पुरवठा योजना व विमानतळ विकास योजनेतील गैरव्यवहारासंदर्भातही गुन्हे पोलिसात नोंदविण्यात आले आहेत. पण कायम आयुक्त नसल्याने त्यावर कोणतीही कारवाई होऊ शकलेली नाही.
सक्षम व कडक शिस्तीच्या कायमस्वरुपी आयुक्तांची मागणी करण्यात येत आहे. महापालिकेचे तत्कालीन उपायुक्त व सध्या उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत साजिद पठाण यांचा आयुक्तपदावर येण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. पठाण हे जळगावचेच असल्याने त्यांच्या नावाला महापालिकेतून तीव्र विरोध केला जात आहे.