नवेगाव-नागझिरा या पाच महिन्यांपूर्वी जाहीर झालेल्या नव्या व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्राची रचना व निर्मितीकरिता अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षकांच्या अध्यक्षतेखाली समिती पुनर्गठीत करण्यात आली आहे. ही समिती या नव्या व्याघ्र प्रकल्पाचे बफर क्षेत्र निश्चित करणार आहे.
देशातील ४६वा आणि महाराष्ट्रातील पाचवा व विदर्भातील चौथा नवेगाव-नागझिरा हा व्याघ्र प्रकल्प १२ डिसेंबर २०१३ला अधिसूचनेद्वारे जाहीर करण्यात आला. एकूण ६५६.३६ चौरस किलोमीटरच्या या व्याघ्र प्रकल्पात नवेगाव राष्ट्रीय उद्यान १२९.५५, नवेगाव वन्यजीव अभयारण्य १२२.७५, नागझिरा वन्यजीव अभयारण्य १५२.५८, न्यू नागझिरा वन्यजीव अभयारण्य १५१.३३ आणि कोका वन्यजीव अभयारण्य १०० चौरस किलोमीटर या क्षेत्राचा समावेश आहे. या नवनिर्मित व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्राची रचना व निर्मितीकरिता वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ नुसार तज्ज्ञांची समिती गठीत करण्याची तरतूद आहे. त्यानुसार नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्राची रचना व निर्मितीकरिता वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ व अनुसूचित जनजाती व इतर पारंपरिक वनवासी अधिनियम २००६ मधील तरतुदी विचारात घेण्यात येतील. बफर क्षेत्राची रचना व निर्मितीकरिता अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव-पूर्व) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत वनविकास महामंडळाचे महाव्यवस्थापक, ताडोबा, पेंच व मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक, मुख्य वनसंरक्षक (नागपूर प्रादेशिक), भंडारा/गोंदियाचे उपवनसंरक्षक, भंडारा/गोंदियातील व्याघ्र प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रातील मानद वन्यजीव रक्षक, निसर्ग संरक्षण संस्थेचे दिलीप गोडे, वाईल्डलाईफ ट्रस्ट ऑफ इंडियाचे प्रफुल्ल भांबूरकर, सातपुडा फाउंडेशनचे किशोर रिठे, गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथील भवभूती महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाचे डॉ. भुसकुटे यांची सदस्य म्हणून तर गोंदिया वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक यांची संयोजक म्हणून निवड करण्यात आली आहे. तज्ज्ञांची ही समिती त्यांना योग्य वाटेल अशा शासकीय व अशासकीय संबंधित व्यक्तींना बैठकीसाठी आमंत्रित करू शकतील. या अशासकीय सदस्यांना समितीच्या कामानिमित्त केलेल्या प्रवासापोटी प्रवास खर्चाची प्रतिपूर्ती शासकीय नियमानुसार देण्यात येईल.