माजी सैनिकांच्या कल्याणकारी कार्यक्रमांसाठी राज्यभरात २३ कोटी रुपये ध्वजदिन निधी वर्षभर संकलित केला जाणार असून गैरप्रकार टाळण्यासाठी आता प्रत्येक जिल्ह्य़ात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे निधी संकलनावर नियंत्रण राहणार आहे.
देशाच्या सीमांचे आणि स्वातंत्र्याचे प्राणपणाने रक्षण करतानाच देशात उद्भवणाऱ्या कायदा व सुव्यवस्थाविषयक समस्या, अतिवृष्टी, वादळे किंवा भूकंपासारख्या आपत्तीत नागरिकांच्या सहाय्याला त्वरेने धावून जाऊन बहुमोल कामगिरी बजावणाऱ्या सैनिकांचे हे ऋण अल्प स्वरूपात फेडण्याची संधी जनतेला ध्वजदिनाच्या निमित्ताने प्राप्त होत असते. संपूर्ण राज्यभरात ६ डिसेंबर २०१३ ते ३० नोव्हेंबर २०१४ या काळात २३ कोटी ९५ लाख रुपये निधी संकलन केले जाणार आहे. जिल्हाश: इष्टांक ठरवून देण्यात आले आहेत. त्यापैकी ७५ टक्के निधी मे २०१४, तर ऑगस्ट २०१४ पर्यंत ९० टक्के निधी संकलन करावयाचे आहे. लहान व मोटारीवर लावण्याचे ध्वज, तसेच रोख देणगी अशा स्वरूपात निधी संकलन केले जाईल.
कोटय़वधी रुपये निधी संकलन करावयाचे असल्याने त्यातील गैरप्रकार टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती त्यावर नियंत्रण ठेवेल. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक अथवा उपायुक्त, जिल्हा उद्योग अधिकारी, शिक्षणाधिकारी, जिल्हा प्रसिद्धी अधिकारी हे समितीचे सदस्य असून जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सदस्य सचिव राहतील. या निधी संकलन कार्यक्रमांची यशस्वीरित्या अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने जिल्ह्य़ातील कोणत्याही अधिकाऱ्यास या समितीत सदस्य म्हणून समाविष्ट करण्याची जिल्हाधिकाऱ्यांना मुभा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे माजी सैनिकांच्या पुनर्वसनात ज्यांना रस आहे, अशा काही ज्येष्ठ माजी सैनिक अधिकाऱ्यांचा किंवा शासकीय व्यक्तींचा, तसेच जिल्ह्य़ातील उद्योग, सहकार, व्यापार, शैक्षणिक आदी क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींचाही समावेश करता येईल. मात्र, वीसपेक्षा जास्त सदस्य या समितीवर न ठेवण्याचे बंधन घालण्यात आले आहे.
जिल्ह्य़ात कशा पद्धतीने निधी गोळा करावा, यासाठी विविध क्षेत्रातील व्यक्ती आणि संस्था यांचा सहभाग कसा असावा, विविध शासकीय खाती, स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित संस्था, शैक्षणिक व इतर संस्था, कारखाने, बँका, सहकारी संस्था यांना किती लक्ष्य द्यावे, याचा विचार या जिल्हा समितीला करावा लागणार आहे. एखाद्या व्यक्तीकडून किती निधी घ्यायचा, याचे बंधन नाही. विद्यार्थ्यांंकडून अल्प प्रमाणात का होईना निधी स्वीकारला जाणार आहे. विद्यार्थी, लहान-लहान गटांनाही निधी संकलनात सामावून घेतले जाणार आहे. मात्र, प्रत्येक दानदात्याला निधीची पावती देण्याची काळजी समितीला घ्यायची आहे. काटेकोर दैनंदिन हिशेब या समितीला ठेवावा लागणार आहे. प्रत्येक महिन्यात किमान एक बैठक घेऊन प्रत्येक महिन्यातील निधी संकलनाची माहिती सैनिक कल्याण संचालकांकडे सादर करावी लागेल. ही माहिती कल्याण संचालकांनी प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेपर्यंत शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाला सादर करावी लागणार आहे. ध्वजदिन संकलनाची डबा पद्धत बंद बंद करण्यात आली असून फक्त संकलन शुभारंभाच्या कार्यक्रमातच सिलबंद डबे ठेवली जातील, असे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.

.