सामान्यातील सामान्य माणूस हा सहकारी बँकांचा खरा आधार असून, देशाची अर्थव्यवस्था ही सहकार चळवळ जिवंत राहण्यासाठी ९७ व्या घटनादुरुस्तीमध्ये येऊ घातलेले बदल निश्चितच बदल घडविणारे आहेत, असे मत महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी व्यक्त केले.
कराड अर्बन बँकेच्या मसूर (ता. कराड) शाखेच्या नूतन प्रवेश व मूल्यांकनकार मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाषराव एरम, उपाध्यक्ष डॉ. राजीव अहिरे, मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव, बँकेचे सर्व संचालक, ग्राहक समिती सदस्य, व्हॅल्युअर, मूल्यांकनकार, ग्रामस्थांची यावेळी उपस्थिती होती.  
विद्याधर अनास्कर म्हणाले की, सामान्य माणसाच्या दृष्टीने सहकार क्षेत्राची प्रतिमा चांगली नसली तरी घटनादुरुस्तीमुळे ती अधिक चांगली होणार आहे. या घटनादुरुस्तीमुळे सभासदांना जादा अधिकार मिळणार असून, ज्या बँका अधिक पारदर्शकपणे काम करतील त्या टिकतील. कराड अर्बन बँकने पश्चिम महाराष्ट्रात आपल्या पारदर्शक कारभाराद्वारे चांगला लौकिक प्राप्त केला असून, बँकेची सर्वसामान्य सभासदांबरोबर असणारी निष्ठा ही बँकेच्या प्रगतीचे खरे लक्षण आहे.
सुभाषराव जोशी म्हणाले की, कराड अर्बन बँकेने सातत्याने गुणात्मकतेचा विचार करून सभासद, ग्राहकांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केला. कोअर बँकिंग प्रणाली, एटीएम सारख्या सुविधा दिल्या. त्यामुळे बँक लौकिकास पात्र ठरली आहे.
डॉ. सुभाषराव एरम म्हणाले की, सहकार कायद्यातील तरतुदींच्या अनुषंगाने सभासदांना सहकारी बँकेच्या कामकाजाचा अभ्यास व्हावा यासाठी बँक वेळोवेळी ग्राहक व सभासदांसाठी सातत्याने विविध कार्यक्रमांच्या वेळी प्रशिक्षणाचे कार्यक्रम राबवित असते.
दिलीप गुरव म्हणाले की, बँकेने सातत्याने नवीन तंत्रज्ञान स्वीकारत प्रगती साध्य केली आहे. अॅन्टी मनी लॉन्ड्रींग या विषयावर नुकतेच केंद्र सरकारच्या अर्थमंत्रालयाने कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेचा लाभ सातारा, सांगली, कोल्हापूर व रत्नागिरी या जिल्ह्यातील बँकांना झाला.
कार्यक्रमात नॅशनल फायनान्स स्वीचला जोडण्यात आलेल्या रूपे एटीएम कार्डचे विद्याधर अनास्कर यांच्या हस्ते लाँचिंग करण्यात आले. ग्राहक समिती सदस्य के. एल. कुलकर्णी, रमेश राजमाने, युवराज पवार, पांडुरंग खरे व संतोष जगताप यांना प्रातिनिधिक स्वरूपात बँकेमार्फत ज्ञानेश्वरी गं्रथ भेट देण्यात आला.