दरवर्षी बुद्धपौर्णिमेला अभयारण्यातील पाणवठय़ाजवळ होणाऱ्या वन्यप्राणी प्रगणनेत सामान्य नागरिकांना सहभागी होण्याची संधी मिळते. गतवर्षी नागपूर विभागात केवळ पेंच आणि मानसिंगदेव या दोन अभयारण्यातच प्रगणना झाल्याने सामान्य नागरिकांच्या हौसेवर पाणी फेरल्या गेले होते. त्यामुळे यावर्षी येत्या १४ मे रोजी संपूर्ण राज्यातील अभयारण्यात आयोजित वन्यप्राणी प्रगणनेत सामान्य नागरिकांना संधी मिळणार का, हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होणार आहे.
देशभरातील वन्यजीवप्रेमींसाठी बुद्ध पौर्णिमेचा दिवस हा विशेष असतो. देशातले व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्यात यादिवशी वन्यजीवप्रेमी, अभ्यासक, वनविभागाचे कर्मचारी व्याघ्र गणनेसाठी एकत्र येतात. राज्यातील सर्व अभयारण्यात येत्या १४ मे रोजी बुद्धपौर्णिमेला पाणवठय़ाजवळील प्रगणना होणार आहे. वनविभागाने नुकतेच प्रगणनेच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे. मात्र, त्याचवेळी व्याघ्रप्रगणनेचा चौथा टप्पा सुरूअसल्यामुळे नेमक्या कोणत्या व किती अभयारण्यात वन्यजीव प्रगणना होणार हे अद्याप निश्चित व्हायचे आहे. त्यानुसारच अभयारण्यातील पाणवठय़ावर मचाण उभारण्यात येतील. गतवर्षी सामान्य नागरिकांपासून ही संधी हिरावल्या गेली, पण यावर्षी मात्र त्यांना प्रगणनेत सहभागी होता येईल. त्यासाठी वनविभागातर्फे नागरिकांकडून प्रगणनेत सहभागी होण्यासाठी अर्ज मागवण्यात येतील.
याप्रकारच्या वन्यप्राणीगणनेत पाणवठय़ावर वन्यप्राणी येण्याची आणि जाण्याची वेळ, वन्यप्राण्यांच्या प्रजाती आणि त्यांच्या सवयी आदी बारिकसारिक नोंदी यादरम्यान केल्या जातात. त्यामुळे या काळात अभयारण्य पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येते. नागपूर जिल्ह्यात पेंच व्याघ्रप्रकल्प, मानसिंगदेव, उमरेड-कऱ्हांडला अभयारण्य, वर्धा जिल्ह्यात बोर अभयारण्य, गोंदिया जिल्ह्यात नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प, भंडारा जिल्ह्यातील कोका अभयारण्य, अमरावती जिल्ह्यात मेळघाट व्याघ्र प्रकल्प, यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर, पैनगंगा अभयारण्य, बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्य बुद्धपौर्णिमेला होणाऱ्या वन्यप्राणी प्रगणनेदरम्यान पर्यटकांसाठी दोन दिवस बंद ठेवण्यात येतील. मात्र, त्याचवेळी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाकडे असलेला देशांतर्गत व विदेशी पर्यटकांचा ओढा बघता हा व्याघ्र प्रकल्प बंद राहण्याची शक्यता फार कमी आहे.